बनावट कागदपत्रे सादर केल्याने शिकावू अनुज्ञप्ती रद्द करुन पोलीस तक्रार दाखल· मोटार वाहन निरीक्षकाची कर्तव्यात कसूर नाही


बनावट कागदपत्रे सादर केल्याने

शिकावू अनुज्ञप्ती रद्द करुन पोलीस तक्रार दाखल

·        मोटार वाहन निरीक्षकाची कर्तव्यात कसूर नाही

 

          वाशिम, दि. 03 (जिमाका) : शिकावू अनुज्ञप्तीबाबत अर्जदार श्री. सैय्यद हुसेन सैय्यद अब्दुल्ला यांनी 24 जानेवारी 2022 रोजी प्राप्त केलेल्या शिकावू परवानाबाबतची वस्तुस्थिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलीस विभागाला 31 जानेवारीला कळविली. केंद्रीय मोटार वाहन कायदा 1988 कलम क्र. 9 व 11 नुसार अर्जदार श्री. सैय्यद हुसेन यांना रस्त्यावर वाहन चालविण्याकरीता पक्की अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेली नाही. श्री. सैय्यद हुसेन यांनी मोटार वाहन कायद्यानुसार शिकावू परवाना प्राप्त केला आहे. शिकावू अनुज्ञप्ती ही वाहन रस्त्यावर चालविण्याकरीता नसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आहे. शिकावू अनुज्ञप्तीची कायदेशीर वैधता फक्त सहा महिने असते. त्यानंतर सदर शिकावू अनुज्ञप्ती आपोआप रद्द होते.

              ऑनलाईन पध्दतीने अर्ज व कागदपत्रे सारथी 4.0 या प्रणालीवर स्वत: अर्जदार श्री. सैय्यद हुसेन यांनीच लॉगीनवर अपलोड केला. त्यामुळे अर्जदाराने अपलोड केलेल्या कागदपत्राबाबत अर्जदार स्वत: जबाबदार असतो. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी जबाबदार असल्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. परिवहन विभागाकडून शिकावू अनुज्ञप्ती जारी करतांना अर्जदाराने ऑनलाईन पध्दतीने स्वत: सादर केलेला अर्ज, त्यातील माहिती व कागदपत्राच्या आधारे शिकावू अनुज्ञप्ती अधिकाऱ्यांकडून जारी केली जाते. अर्जदाराची खात्री करण्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस विभागासारखा फॉरेन्सीक विभाग किंवा यंत्रणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नाही. अर्जदाराची खात्री करुन पुढील कार्यवाही करावी, अशाप्रकारची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही तसा शासन आदेशही नाही. अनुज्ञप्ती जारी केल्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराने अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे दिसून आल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम 1988 कलम 19 (1) नुसार अनुज्ञप्ती रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार अर्जदार श्री. सैय्यद हुसेन यांची शिकावू अनुज्ञप्ती 31 जानेवारी 2022 रोजी रद्द करण्यात आली. व त्याच दिवशी श्री. सैय्यद हुसेन यांच्याविरुध्द पोलीस तक्रार दाखल करण्यात आली.

            या प्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षक श्री. सतिश इंगळे यांनी स्वत:हून ही बाब उघडकीस आणली. त्यामुळे श्री. इंगळे यांचेकडून कर्तव्यात कसुर झाल्याचे दिसून येत नाही. जानेवारी 2022 मध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असतांना परिवहन कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अर्जदारांचे कोरोना संदर्भात पालन करावयाच्या कार्यपध्दतीनुसार सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे याबाबीचा अर्जदाराने गैरफायदा घेतल्याचे दिसून येते. त्यातही जुन्या अनुज्ञप्तीवर नवीन वाहन संवर्गाची नोंद करणे यासाठी अर्जदाराला संगणकीय परीक्षा देण्याची आवश्यकता नसल्याची जाणीव होती व त्यामुळे त्याने शासनाची फसवणूक केली.

            श्री. सैय्यद हुसेन यांचे शिकावू अनुज्ञप्ती प्राप्त करण्याच्या कार्यवाहीमध्ये बाहय व्यक्ती श्री. शेख जाफर शेख मुख्त्यार ही संपुर्ण कार्यवाहीमध्ये अर्जदारासोबत उपस्थित होती. त्याबाबतचे कार्यालयात सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यामुळे शेख जाफर शेख मुख्त्यार यांनी सदरहू बाब उघडकीस आणली असे म्हणणे चुकीचे असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.  

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे