कारंजा येथील रोजगार मेळाव्यात १०२ रोजगार इच्छुक उमेदवारांची रोजगारासाठी निवड

कारंजा येथील रोजगार मेळाव्यात

१०२ रोजगार इच्छुक उमेदवारांची रोजगारासाठी निवड

        वाशिम, दि. 21 (जिमाका) : कारंजा येथे १९ जून रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १०२ रोजगार इच्छूक उमेदवारांची विविध कंपन्यात रोजगारांसाठी प्राथमिक निवड करण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी दिली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या धोरणानुसार जिल्हयातील रोजगार इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात. याच धर्तीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाकडून जिल्हयातील नोकरी/रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने १९ जून २०२२ रोजी कारंजा येथे सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत रोजगार मेळावा संपन्न झाला.

            या मेळाव्यात मेगाफिड बायोटक, वाशिम, महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय बहुउद्देशिय संस्था, वाशिम/यवतमाळ, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, चाकण, पूणे, पियाजियो व्हेवीकल्स प्रा. लि. बारामती, पूणे, बजाज इलेक्ट्रिकल्स लि. औरंगाबाद / पूणे आणि टॅलेन सेतु सर्व्हिसेस प्रा. लि. पूणे या उद्योगाकडील उद्योजक आणि त्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना खाजगी नोकरी/रोजगार देण्यासाठी उपस्थित होते.

           मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला कारंजाचे माजी नगराध्यक्ष शेषराव ढोके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजाचे प्राचार्य वसंत राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम श्रीमती बजाज यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा विशद करतांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गतच्या विविध लोकोपयोगी योजनांची सविस्तरपणे माहिती दिली. या रोजगार मेळाव्यात प्रत्यक्षपणे २७१ स्त्री-पुरुष उमेदवार उपस्थित होते. उपस्थित स्त्री-पुरुष उमेदवारांची मुलाखत घेवून एकुण १०२ इच्छूक स्त्री-पुरुष उमेदवारांना रोजगारांसाठी प्राथमिक निवड करण्यात आली. यावेळी श्री. ढोके यांनी देश तसेच राज्यात असलेली रोजगाराची वाणवा उपस्थित रोजगार इच्छुक उमेदवारांच्या लक्षात आणून देतांना उपस्थित उद्योगात रोजगार मिळवून आपापली प्रगती करण्याचा मौलिक सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सिमा खिरोडकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे