प्रत्यक्ष कृतीतून यंत्रणांनी विकासाला गती द्यावी श्री. नंदकुमार

प्रत्यक्ष कृतीतून यंत्रणांनी विकासाला गती द्यावी 
                                 श्री. नंदकुमार 

वाशिम दि.12 (जिमाका) जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. पारंपरिक पीक पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल करण्याचे नियोजन कृषी विभागाने करावे.शेतकऱ्यांनी बहुपीक लागवड करून नगदी पिकाचे उत्पन्न घ्यावे.मुलांचे कुपोषण दूर करण्यासोबतच महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देऊन त्याच्या शैक्षणिक प्रगतीचे नियोजन करावे.आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिमला मागासलेपणाचा लागलेला ठपका दूर करण्यासाठी यंत्रणांनी प्रत्यक्ष कृतीतून काम करून विकासाला गती द्यावी. असे निर्देश पालक सचिव श्री. नंदकुमार यांनी दिले.
             आज 12 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित सभेत श्री नंदकुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
           श्री नंदकुमार म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यांत्रिक पद्धतीने शेती करण्यासाठी कृषी विभागाने त्यांना प्रोत्साहित करावे.शेतीवरचा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील  शेतकर्‍यांचे गावोगावी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावे.त्यामुळे त्यांच्या प्रेरणेतून इतर शेतकरी विविध प्रकारचे प्रयोग करण्यास प्रोत्साहित होतील.शेतीसाठी दरवर्षी बाजारपेठेतून बियाणे घेण्याऐवजी शेतकरी दरवर्षी घरचेच बियाणे वापरून त्यांचा शेतीसाठी होणारा खर्च वाचवता येईल.जिल्ह्यात कृषी क्षेत्रात चांगले काम होत आहे.कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना कृषी ज्ञानाची जोड द्यावी असे ते म्हणाले.
               आजची बालके ही देशाचे भविष्य आहे असे सांगून श्री नंदकुमार म्हणाले,जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील अंगणवाडीच्या लाभार्थी बालकांचे नियमित वजन आणि उंची मोजण्यात यावी.तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालके सर्वसाधारण श्रेणीत लवकर कशी येतील यासाठी योग्य आहार देऊन वैद्यकीय उपचार करण्यात यावेत.त्यांच्या कुपोषणाची कारणे शोधण्यात यावी.असे ते म्हणाले.
           बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाने काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे सांगून श्री नंदकुमार म्हणाले, महिलांची नियमित हिमोग्लोबीन तपासणी करण्यात यावी. जिल्ह्यात शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मुलांच्या शैक्षणिक विकासाला चालना देऊन मुले शिकून पुढे गेली पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब  मग्रारोहयोतून प्रत्येक कुटुंब लखपती कसे बनेल याचे नियोजनही करावे.असे त्यांनी यावेळी सांगितले.    
         जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात कृषी क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी चांगले काम केले आहे. त्यांचे अनुभव कथन गावोगावी आयोजित करण्यासोबतच त्यांच्या कामाची चित्रफीत इतर शेतकऱ्यांना दाखवावी.त्यामुळे तसे काम त्यांना  शेतीच्या क्षेत्रात करता येईल. बालकांचे व मातेचे कुपोषण दूर करण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग लक्ष देत आहे.सोयाबीन पिकासह इतरही पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात उपलब्ध मानव संसाधनाचा माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी यंत्रणा काम करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
          श्रीमती पंत म्हणाल्या, जिल्ह्यातील कमी वजनाची बालके सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी नियोजनातून काम करण्यात येत आहे. नियमितपणे अंगणवाड्यातील लाभार्थी बालकांचे वजन व उंची मोजण्यात येत आहे. त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रयोगशील आणि कार्यतत्पर शिक्षकांची मदत घेण्यात येईल. असे त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.तोटावार यांनी कृषी क्षेत्रातील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे यांनी आरोग्य क्षेत्रात,श्री.जोल्हे यांनी बालकांचे कुपोषण व त्यांचा आहार आणि श्री.डाबेराव यांनी शिक्षण क्षेत्रात करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.
                 या सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर,शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) राजेश शिंदे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती  वाठ,जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे,जिल्हा उपनिबंधक विनायक डहाळकर,बाल विकास प्रकल्प अधिकारी( शहरी) मीनाक्षी भस्मे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोरे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे