बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपावर लक्ष केंद्रीत करावे -षण्मुगराजन एस.बँकांकडून खरीप पीक कर्ज वाटप आढावा

बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपावर लक्ष्‍ा केंद्रीत करावे

                                            -षण्मुगराजन एस.

बँकांकडून खरीप पीक कर्ज वाटप आढावा

         वाशिम, दि. 02 (जिमाका) : खरीप हंगामातील शेतीची मशागतीची कामे जवळपास पुर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामाच्या लागवडीसाठी बियाणे व खते वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी ती खरेदी करण्यासाठी बँकांकडून देण्यात येणारे पीक कर्ज शेतकऱ्यांना योग्य वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपाला सर्वोच्च प्राथमिकता देऊन लक्ष केंद्रीत करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

             आज 2 जून रोजी वाकाटक सभागृहात बँकांकडून सन 2022-23 खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा आयोजित सभेत घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

             श्री. षण्मुगराजन म्हणाले, सर्व बँक शाखांनी आपल्या पात्र सभासद शेतकऱ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. त्यांना बँकेत येण्यास सांगून येत्या 15 जूनपर्यंत 90 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे. राष्ट्रीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपासाठी विशेष पुढाकार घ्यावा. या बँकांनी पीक कर्ज वाटपाची उदासिनता दूर करावी. ज्या बँकांची पीक कर्ज वाटपात प्रगती दिसून येत नाही, त्या बँकेच्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत त्यांच्या वरिष्ठांना कळविण्यात येईल. कोणत्याही अडचणी न सांगता बँकांनी पीक कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे असे ते म्हणाले.

            दररोज बँक अधिकाऱ्यांनी वैयक्तीक शेतकऱ्यांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. त्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत येण्याबाबत कळवावे. कोणताही पात्र शेतकरी हा येत्या खरीप हंगामात पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. तसेच पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याच्या बँकेबाबतच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी. असे श्री. षण्मुगराजन यांनी यावेळी सांगितले.

             श्री. निनावकर यांनी 31 मे 2022 पर्यंत बँकांनी वाटप केलेल्या खरीप पीक कर्जाबाबतची माहिती दिली. सन 2022-23 च्या खरीप हंगामात जिल्हयातील 1 लाख 8 हजार 750 शेतकऱ्यांना 1150 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी 31 मे पर्यंत 74 हजार 996 शेतकऱ्यांना 659 कोटी 38 लक्ष 63 हजार रुपये बँकांनी पीक कर्ज वाटप केले असून कर्ज वाटपाचे प्रमाण 68.96 टक्के इतके आहे. 1615 नवीन शेतकरी सभासदांना यावर्षी 21 कोटी 98 लाख 32 हजार रुपये खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. 73 हजार 381 खातेदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे नुतनीकरण करुन त्यांना 627 कोटी 40 लाख 31 हजार रुपये पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

             सर्वाधिक पीक कर्ज वाटप अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. 31 मे पर्यंत त्यांनी 55 हजार 277 शेतकऱ्यांना 453 कोटी 42 लाख रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेने 8143 शेतकऱ्यांना 88 कोटी 36 लाख, बँक ऑफ इंडियाने 1161 शेतकऱ्यांना 11 कोटी 11 लाख, पंजाब नॅशनल बँकेने 133 शेतकऱ्यांना 1 कोटी 36 लाख रुपये वाटप केले असून उर्वरित राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती श्री. निनावकर यांनी दिली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्याधिकारी श्री. सरनाईक, जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी श्री. सरकटे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक श्री. भोयर यांचेसह विविध राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे जिल्हा समन्वयक यांची उपस्थिती होती.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे