वाशिम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा


वाशिम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा 
वाशिम दि.२१(जिमाका) जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद,वाशिम यांच्या संयुक्त वतीने ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज २१ जून रोजी वाटाणे लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आमदार ऍड. किरणराव सरनाईक,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोरे,शिक्षणाधिकारी (माध्यमिक),रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व वाटाणे लॉनचे संचालक श्री.वाटाणे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
         उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीमती पंत यांनी योग दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन केले. यावेळी योग प्रशिक्षक डॉ. अर्चना मेहकरकर,तेजस्विनी माणिकराव आणि आशिष जामकर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व विशद करून विविध योगासने शिकवून उपस्थितांकडून करून घेतली. 
             योगादरम्यान मानेचे व्यायाम,वृक्षासन,पादहस्तासन,
अर्धचक्रासन,त्रिगुणासन,जेवणानंतर त्वरित करता येणारे व जेवण पचविण्यास मदत करणारे वज्रासन, श्वसन तंत्र सुधारण्यासाठी दंडासन, भद्रासन, पचनसंस्था सुधारण्यासाठी अर्धंउष्ट्रासन,शशांकासन,मण्डुकासन, दंडासन,वक्रासन,भुजंगासन, शलभासन,सेतुबंधासन,उत्तपादासन, कपालभारती,अनुलोम-विलोम प्राणायाम,शीतली प्राणायाम,भ्रामरी प्राणायाम,अर्धहलासन,पवनमुक्तासन आणि परिश्रमानंतर करावयाचे आसन म्हणजे शवासन आदी आसने व योगासने योग प्रशिक्षकांनी उपस्थितांकडून करून घेतली.
              योग दिनाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयाचे,विविध विभागाचे व जिल्हा परिषदेचे अधिकारी - कर्मचारी,माऊंट कारमेल शाळेचे विद्यार्थी,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,शिक्षक व युवक-युवतींनी सहभाग घेतला.संचालन दिलीप जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार राजेश शिंदे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे