१४ ते २० नोव्हेंबर बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह
१४ ते २० नोव्हेंबर
बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह
वाशिम, दि. 11 (जिमाका) : जिल्हयात १० जुलै २००६ पासून कृतीदलाची स्थापना झाली आहे. कृती दलाचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येऊन धाडसत्राचे आयोजन करण्यात येते. वाशिम जिल्हा कृती दलाने जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत एकूण ७ धाडसत्रांचे आयोजन केले. एकूण १२३ आस्थापनांना भेटी दिल्या. या धाडसत्रादरम्यान एकुण ७ बालकामगारांची मुक्तता केली. दोन आस्थापना मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन ७ किशोरवयीन कामगारांचे नियमन करण्यात आले.
कामाच्या ठिकाणी बाल कामगार काम करीत असतांना आढळल्यास बालकामगार व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम १९८६, सुधारणा २०१६, कलम ३ व ३ (अ) नुसार फौजदारी गुन्हा ठरत असून, संबंधीत मालक, मुख्य मालक, कंत्राटदार यांचे विरुध्द वरील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. कलम १४ नुसार संबंधीत मालक, मुख्य मालक, कंत्राटदार दोषी आढळल्यास ६ महिने ते २ वर्ष किंवा २० हजार ते ५० हजार रुपये अथवा दोन्ही एवढया शिक्षेची तरतूद आहे. सर्व आस्थापना धारकांनी बाल कामगार कामावर ठेवू नये. बाल कामगार काम करीत असल्याचे आढळून असल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर व वेठबिगार कामगार काम करीत असल्याचे आढळून आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२५२-२३५०५३ वर संपर्क साधावा. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment