जिल्हाधिकाऱ्यांची फाळेगाव (थेट) शिवारात भेट वनराई बंधारा व विविध पिकांची पाहणी
जिल्हाधिकाऱ्यांची फाळेगाव (थेट) शिवारात भेट
वनराई बंधारा व विविध पिकांची पाहणी
वाशिम दि१६ (जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज १६ नोव्हेंबर रोजी वाशिम तालुक्यातील फाळेगाव( थेट) शिवारात शेतकरी गट आणि कृषी विभाग यांनी बांधलेल्या वनराई बंधाऱ्याची पाहणी केली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम शंकर तोटावार,तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड,तंत्र अधिकारी प्रकाश कोल्हे,मंडळ कृषी अधिकारी भागवत किंगर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कृषी पर्यवेक्षक राजेश राठोड,कृषी सहाय्यक दत्ता शिंदे, महादेव सोळंके,श्रीनिवास मुंडे, बाबाराव राठोड आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी मान्यवरांना फाळेगाव (थेट) येथील शेतकरी गट व कृषी विभाग यांनी श्रमदानातून संतोष मोतीराम कोरडे यांच्या शेतात बांधलेला वनराई बंधारा दाखवून, त्याची माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.तोटावार यांनी जिल्ह्यात रब्बी हंगामात नव्याने लागवड करण्यात येत असलेले राजमा पिकाची माहिती देताना ३५ एकर क्षेत्रावर फाळेगाव(थेट) या गाव शिवारात या पिकाची लागवड झाली असून १९ शेतकऱ्यांनी ही लागवड केल्याचे सांगितले.
श्री.षण्मुगराजन यांनी यावेळी कोरडे यांच्या राजमा लागवड क्षेत्रासही भेट दिली.फाळेगाव येथे शेतकरी गटामार्फत राबविण्यात येणारा दुग्ध संकलनाचा उपक्रमही शेतकऱ्यांनी यावेळी दाखविला. त्या ठिकाणी होत असलेली दुग्ध संकलन तसेच संकलनाच्या पद्धती व दुग्ध चाचणी विषयीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तसेच कांदा बीजोत्पादन क्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांशी हितगुज करून बीज उत्पादन कांदा लागवडीविषयी माहिती घेतली.पारडी (आसरा) येथील शेख करीम शेख सोनू यांच्या पेरू फळबाग लागवड क्षेत्रासही यावेळी त्यांनी भेट दिली.
फाळेगाव( थेट) येथील गजानन कोरडे,नारायण भिमटे,भारत कोरडे व शेतकरी उत्पादक कंपनीचे तसेच शेतकरी गटाचे शेतकरी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment