परिस्थीतीवर मात करुन दिपक झाला विक्रीकर निरीक्षक जिल्हाधिकाऱ्यांनी केला दिपकचा सत्कार
- Get link
- X
- Other Apps
परिस्थीतीवर मात करुन दिपक झाला विक्रीकर निरीक्षक
जिल्हाधिकाऱ्यांनी केला दिपकचा सत्कार
वाशिम, दि. 24 (जिमाका) : वाशिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील 40 वर्षापासून उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बुट पॉलीश करण्याच्या आपल्या पारंपारीक व्यवसायातून कुटूंबाचा चरितार्थ चालविणारे रामभाऊ खंदारे यांचा उच्च शिक्षीत मुलगा दिपक याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली. दिपकच्या या यशाचे कौतुक जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 24 नोव्हेंबर रोजी त्यांच्या कक्षात दिपकचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन केले. दिपकच्या शैक्षणिक व कौटूंबिक परिस्थीतीची माहिती दिपककडून जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली व पुढील यशस्वी कारर्किदीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिपकचे वडील श्री. रामभाऊ खंदारे यांचेकडे शेती नाही. दारिद्रय रेषेखालील जीवन जगत असतांना बुट पॉलीश व्यवसायातून ते कुटूंबाचा आजही चरितार्थ चालवितात. आपण शिक्षण घेऊ शकलो नसलो तरी आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन त्याला चांगल्या नोकरीतील पदावर बसलेले बघणे हे त्यांचे स्वप्न दिपकने विक्रीकर निरीक्षक या पदावर जाऊन पुर्ण केले आहे. दिपकचे आई तुळसाबाई हया देखील घरातील काम सांभाळून तेलाच्या घाण्यात काम करुन संसाराला हातभार लावत आहे. दिपकने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक या पदाला गवसणी घातल्याने दिपकचे वडील रामभाऊ व आई तुळसाबाई यांचा आनंद व्दिगुणीत झाला आहे. यापुढेही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कठोर परिश्रम करुन मोठे पद मिळविण्याचे दिपकचे स्वप्न आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात दिपकच्या या अभिनंदनपर सत्कार समारंभाला दिपकचे वडील रामभाऊ खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे व धर्मराज चव्हाण यांची उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment