बालविवाह प्रतिबंधक अधिनियम बालविवाहासाठी ग्रामसेवक,पुरोहित, फोटोग्राफर,आचारी व पाहुणे राहणार कारवाईस पात्र महिला व बालविकास विभागाच्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम

बालविवाहासाठी ग्रामसेवक,पुरोहित, फोटोग्राफर,आचारी व पाहुणे राहणार  कारवाईस पात्र

महिला व बालविकास विभागाच्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

वाशिम दि.10  (जिमाका) बालविवाह होऊच नये यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत.बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषींना दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि आर्थिक दंड होऊ शकतो, परंतु, या कायद्यांना न जुमानता लपूनछपून बालविवाह करण्याचे प्रमाण व बालविवाह तत्परतेने थांबवण्याचे प्रमाण  जिल्ह्यात जास्त आहे.
         बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचा झपाट्याने प्रसार होत आहे.त्यामुळे पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या अनेक रूढी समाजातून हद्दपार होऊ लागल्या आहेत.भारतीय
राज्यघटनेतील समतेचे तत्व आता सर्वत्र रुळू लागले आहे.मात्र अजूनही  " मुलगी झाली हो " हे सांगतानाचे चेहऱ्यावरील नैराश्य अनेक जण लपवू शकत नाहीत.मुलगी म्हणजे ओझे ही भावना अद्यापही समाजात कायम असल्यामुळेच वाशिम जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण वाढत आहे.
मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ पेक्षा कमी असणाऱ्या लग्नसमारंभासाठी यापुढे ग्रामसेवक,पुरोहित, (सर्व धर्माचे),फोटोग्राफर,आचारी, मंडप डेकोरेशन,वाजंत्री पथक,डीजे, उपस्थिती पाहुणे तसेच संबंधित बालकाचे आईवडील हे जबाबदार राहणार आहे, हे सर्व जण दोन वर्षाच्या सक्षम कारावासास पात्र असतील.त्यामुळे शासनाचे कान, डोळे जागरूक ठेवून या सर्वांनी असा विवाह होऊ देवू नये.
      महिला व बाल विकास विभाग यांचे सुधारित परिपत्रक अधिसूचना २१ ऑक्टोबर २०२२ नुसार प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत.वाशिम जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक,पोलीस निरीक्षक (शहरी/ग्रामीण), मुख्य
कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी,विशेष बाल पोलीस पथक, यांचेमार्फत या परिपत्रकाची अंमलबजावणी होणे बंधनकारक आहे.तसेच गावाच्या ग्रामसेवकासोबतच लग्न लावून देणारे पुरोहित,(सर्व धर्माचे),प्रिंटींग प्रेस प्रिंटर्स, मंडप डेकोरेशन,फोटोग्राफर, आचारी,मंगल कार्यालायचे व्यवस्थापक तसेच उपस्थित असणारे वऱ्हाडी,पाहुणे मंडळी यांना यापुढे आपल्याला काय करायचे अशी बेजबाबदार भूमिका घेता येणार नाही. उलट अशाप्रकारे होणारा बाल विवाह निर्दशनास आल्यास संबंधित अधिकारी यांचे निर्देशनास आणून
देण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे.अशा प्रकारचा बालविवाह झाल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी वरील सर्व संबंधित बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये कलम ९,१०,११ च्या कायदेशीर कारवाईस पात्र असतील. तसेच २ वर्षाचा सश्रम कारावास व एक लाख रुपये दंड होऊ शकतो. ग्रामसेवक यांना १६ (३) च्या नुसार बालविवाह प्रतिबंध अधिकारी तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प
अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे अशाप्रकारचे कोणताही बालविवाह झाल्यास त्यासंबंधी पुरावे गोळा करणे आणि जर वधू किंवा वर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या साह्याने न्यायालयात प्रकरण दाखल करू शकतात व अशाप्रकारे झालेला बालविवाह रद्दबातल ठरवू शकतात व त्याबाबतची माहिती मासिक त्रैमासिक माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,बाल कल्याण समिती यांना सादर करतील.यापुढे अशा प्रकारचे कोणतेही बालविवाह होत असल्यास चाईल्ड लाईनच्या १०९८ तसेच
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती,विशेष बाल पोलीस पथक बाल कल्याण पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधून नागरिकांनी बालविवाहाबाबतची माहिती देण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश