धनगर समाजातील विद्यार्थ्यांकडून स्वयंम योजनेसाठी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित
- Get link
- X
- Other Apps
धनगर समाजातील विद्यार्थ्यांकडून स्वयंम योजनेसाठी
30 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित
वाशिम, दि. 04 (जिमाका) : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनेच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या 6 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्याबाबतची तरतुद आहे.
पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहे. विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा. अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी हा रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण प्राप्त केले असावे. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात/ संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रकियेव्दारे प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे.
धनगर समाजातील इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 डिसेंबर 2022 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम येथे अर्ज सादर करावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment