समाजात सामाजिक बंधुता कायमराहील यादृष्टीने काम व्हावे -ज.मो.अभ्यंकर ॲट्रासिटी प्रकरणांचा आढावा
समाजात सामाजिक बंधुता कायम
राहील यादृष्टीने काम व्हावे
-ज.मो.अभ्यंकर
ॲट्रासिटी प्रकरणांचा आढावा
वाशिम, दि. 11 (जिमाका) : समाजा समाजातील भेदभाव मिटला तर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयातंर्गत गुन्हे घडणार नाही. आपण सर्व जण भारतीय संविधानाने एकत्र बांधले आहोत. हा विचार सर्व समाजात रुजला पाहिजे. सर्वांनी समाजात सामाजिक बंधुता कायम राहिल यादृष्टीने काम करावे. असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले.
आज 11 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात श्री. अभ्यंकर यांनी अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रासिटी कायदयाअंतर्गत जिल्हयात घडलेल्या घटनांचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला आयोगाचे सदस्य आर. टी. शिंदे, के. आर. मेढे. जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव, जिल्हा सरकारी वकील श्री. व्यवहारे, वाशिमचे तहसिलदार विजय साळवे व गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. अभ्यंकर म्हणाले, ॲट्रासिटीच्या प्रकरणात दोषसिध्दीचे प्रमाण वाढले पाहिजे. हे प्रमाण वाढण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घ्यावा. या प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा होण्यासाठी फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये संगनमत होणार नाही, यासाठी पोलीस विभागाने प्राथमिक चौकशी अहवाल ते न्यायनिवाडा होईपर्यत लक्ष द्यावे. त्यामुळे फिर्यादीला न्याय मिळण्यास मदत होईल. जिल्हयात आतापर्यत 47 प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली आहे. फिर्यादीसोबत घडलेल्या गुन्हयाबाबत तो कायम ठाम राहील, याबद्दल त्याच्यात विश्वास निर्माण करावा. त्यामुळे त्याला न्याय मिळेल. असे त्यांनी सांगितले.
ॲट्रासिटी प्रकरणातील साक्षीदारांमध्ये पोलीसांनी विश्वास निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगून श्री अभ्यंकर म्हणाले, पोलीसांचा या प्रकरणात युक्तीवाद महत्वाचा असतो. जिल्हयात ॲट्रासिटीचे गुन्हे घडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम हाती घेतल्यास ॲट्रासिटीचे प्रकरणे आणखी कमी होतील. ॲट्रासिटी कायदयाबाबत जिल्हयात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. असे ते यावेळी म्हणाले. श्री. अभ्यंकर यांना आज प्राप्त झालेली निवेदने पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना देवून तातडीने त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
श्री. षन्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात ॲट्रासिटी कायदयाअंतर्गत घडणाऱ्या गुन्हयांचा दर महिन्यात आढावा घेण्यात येतो. संबधित प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे, यादृष्ट्रीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात करण्यात येते. या कायदयाबाबत जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. बच्चन सिंह यांनी जिल्ह्यात आतापर्यत ॲट्रासिटी कायदयातंर्गत घडलेल्या गुन्हयांची माहिती दिली. आतापर्यत 47 आरोपींना शिक्षा झाल्याचे सांगितले.
श्री. वाठ यांनी ॲट्रासिटी कायदयातंर्गत फिर्यादींना आर्थिक स्वरुपात मदत केली असून निधी उपलब्ध होताच उर्वरित फिर्यादींना मदत देणार असल्याचे सांगितले.
*******
Comments
Post a Comment