जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना लवकर सुविधा उपलब्ध होणार.. संकुल समितीने निविदा मागविल्या ..जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची माहिती


जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना लवकर सुविधा उपलब्ध होणार
संकुल समितीने निविदा मागविल्या

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची माहिती

वाशिम,दि.२२ (जिमाका) जिल्हा क्रीडा संकुलात सन २००४ मध्ये ४०० मीटर धावणमार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.मागील १८ वर्षांपासून या धावन मार्गाची कोणत्याही प्रकारची दूरूस्ती करण्यात आलेली नाही.या धावन मार्गावर सतत धावणे व चालणे केल्यामुळे त्यावरील मुरूम व मातीचे रूपांतर धुळीमध्ये झालेले आहे.यात सुधारणा करण्याकरिता जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे १८ मार्च २०२१ च्या पत्रानुसार प्रस्ताव सादर केला होता.त्यास मंजूरी प्राप्त होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी अंदाजपत्रक व आराखडे तयार करून त्यामध्ये ४०० मीटर धावणमार्ग दुरुस्ती व गटार बंदीस्त करणे हे काम देण्यात आले आहे. 
    जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या २६ जानेवारी २०२१ च्या सभेमध्ये ठरल्यानुसार अंदाजपत्रकीय रक्कम ४ लक्ष ५७  हजारच्या ५० टक्के रक्कम २ लक्ष २९ हजार रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांना वर्ग करण्यात आले. त्यांच्याकडून ४०० मीटर धावणमार्ग दुरुस्ती व गटार बंदीस्त करणे हे काम करण्यात आले. परंतु या कामामध्ये बऱ्याच त्रुट्या आढळून आल्या.त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या कामाची तपासणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, वाशिम यांच्यामार्फत करण्यात आली आहे. तपासणी अहवाल व कामात करावयाची दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग,वाशिम यांना सुचित करण्यात आल्याचे समितीचे सचिव यांनी सांगितले.यावर जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,वाशिम यांना हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.
 ‌          जिल्हा क्रीडा संकुलाचा एकुण परिसर ११ एकरचा आहे.यामध्ये विविध खेळांचे मैदाने तयार करण्यात आलेली आहे.संकुलात खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदानावर गाजर गवत आढळून येत नाही. इतर परिसर हा खेळणे अथवा रनिंग किंवा वॉकिंग करणे याकरीता उपयोगात येत नाही म्हणून त्या ठिकाणी गाजर गवत वाढलेली दिसत आहे.यावर सुद्धा उपाययोजना म्हणून क्रीडा कार्यालयाने जून महिन्यात ट्रॅक्टरद्वारे तणनाशक फवारणी केली आहे.तसेच क्रीडा संकुल समितीकडून एक कर्मचारी हा साफसफाई व गाजर गवत कापण्याकरिता नियुक्त केला आहे.
                जिल्हा क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांमार्फत गवत कटाईचे काम सद्यस्थितीत सुरू आहे.जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल,वस्तीगृह इमारत यामध्ये स्त्रिया व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.इतर खेळाकरिता आलेले खेळाडू व नागरिक यांच्याकरिता शौचालयाची व्यवस्था व्हावी या दुरुस्तीच्या उद्देशाने आर्चरी क्रीडा प्रशिक्षण केंद्र लॉन टेनिस मैदान व संकुलातील खुल्या महिलांना इत्यादी ठिकाणी शौचालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे.याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांना १९ लक्ष ४१ हजार रुपयाचा निधी वितरण करण्यात आला आहे. सद्यस्थितीत आर्चरी मैदानातील शौचालयाचे बांधकाम सुरू आहे.
           जिल्हा क्रीडा संकुलातील समोरील बाजूस संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे अद्याप बाकी आहे. या समोरील भागातून गुरेढोरे संकुलात प्रवेश करतात.त्यांना आवश्यक त्यावेळी संकुलातील कर्मचाऱ्यांमार्फत बाहेर हाकलून दिले जाते.जिल्हा क्रीडा संकुलामध्ये माहे डिसेंबर महिन्यात संकुल समितीमार्फत सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
       जिल्हा क्रीडा संकुल समिती येथील आरो प्लांटची स्थापना सन २०१९ मध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,वाशिम यांच्याकडून करण्यात आली आहे.या प्लांटमार्फत मैदानावरील खेळाडूंना व नागरिकांना एक रुपयांमध्ये एक लिटर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश होता.परंतु हा प्लांट हा वारंवार नादुरुस्त होत असल्याने चालविण्याकरीता कुशल कामगार समितीस उपलब्ध न झाल्यामुळे हा प्लांट कंत्राट पद्धतीने किंवा दरपत्रक मागवून भाड्याने देण्यास यावा असा निर्णय संकुल समितीमार्फत घेण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वाशिम यांच्याकडून आरो प्लांटची तपासणी करण्यात येऊन त्यास इतर व्यक्तीस निविदा प्रक्रियेद्वारे भाड्याने देण्याची प्रक्रिया सुरू आहे.या प्लांटची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संकुलातील खेळाडू व नागरिकांना एक रुपयांमध्ये एक लिटर शुद्ध पिण्याचे पाणी निविदा धारकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
        जिल्हा क्रीडा संकुलात सोलरवर चालणारे स्ट्रीट लॅम्प बसविण्यात आले आहे.संकुलात आवश्यक त्या ठिकाणी ११ स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहे.आणखी १५ स्ट्रीट लाईटची मागणी करण्यात आली आहे.क्रीडा संकुलात सीटीसी टीव्ही कॅमेरे बसणेबाबत संकुल समितीच्या पुढील सभेमध्ये निर्णय घेण्यात येऊन याबाबतची कारवाई पूर्ण करण्यात येईल.त्यामुळे लवकरच जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे