अखेर खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थितीअंतर्गत पिक विमा मंजूर**2 लक्ष 70 हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ*


*अखेर खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थितीअंतर्गत पिक विमा मंजूर*

*2 लक्ष 70 हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ*

वाशिम,दि.10 (जिमाका) प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2023-24 च्या अंमलबजावणीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक वाशिम जिल्हयासाठी करण्यात आली आहे.पावसातील खंड व दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर हंगामातील प्रतिकुल परिस्थीती या बाबीअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के अगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. 
त्याअनुषंगाने माहे, ऑगस्ट 2023 या महिन्यातील 3 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिल्हयातील 46 महसुल मंडळामध्ये वरील कालावधीत सरासरी पावसाच्या 50 टक्केपेक्षा कमी पाऊस पडला. 31 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय समितीची या अनुषंगाने बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीमध्ये जिल्हयातील 46 महसूल मंडळाकरीता हंगामातील प्रतिकुल परिस्थीती या बाबीअंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याबाबत विमा कंपनीस सूचना देण्यात आल्या होत्या. परंतू विमा कंपनीने विभागीय व राज्यस्तरावर अपिल केली होती. दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश ग्राहय धरुन कंपनीने केलेली अपिल फेटाळण्यात आले.    तरी सुध्दा वाशिम जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हंगामातील प्रतिकुल परिस्थीतीअंतर्गत पिक विमा मंजूर करण्यात आला होता.त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांचा व लोकप्रतिनिधींचा कंपनीविरोधात रोष निर्माण झाला. 
             जिल्हयातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने आज 10 नोव्हेंबर रोजी कंपनीने 25 टक्के रक्कम अग्रीम मंजूर केली आहे. याचा लाभ जिल्हयातील 2 लक्ष 70 हजार 993 सोयाबीन उत्पादक विमाधारक शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी भारतीय कृषी विमा कंपनीला केली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी दिली. 
                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे