प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना स्वावलंबन आणि समृद्धीसाठी मिळणार पारंपरिक व हस्तकलेच्या कारागिरांना बळ



प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

स्वावलंबन आणि समृद्धीसाठी मिळणार पारंपरिक व हस्तकलेच्या कारागिरांना बळ

खरा भारत खेड्यात वसलेला आहे असे महात्मा गांधीनी म्हटले आहे. भारत हा कृषीप्रधान देश.कृषी प्रधान देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.पूर्वीच्या काळी देशातील खेडी ही स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होती.खेड्यातील लोकांच्या गरजा ह्या खेड्यातच पूर्ण केल्या जात होत्या.त्यावेळी गावातच बारा बलुतेदारी पध्दत होती.अर्थात हे बलुतेदार म्हणजे गावकारागीर होते. काळ जसा बदलत गेला तसा बदल होत गेला.गावपातळीवरच त्यावेळी शेतीसह अन्य गरजा पूर्ण करणारे बलुतेदार अर्थात कारागीर काळाच्या ओघात मागे पडले.
            जसजसा तंत्रज्ञानाचा विकास होत गेला तसतसी ही कारागीर मंडळी मागे पडत गेली. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या कारागीरांच्या रोजगाराचे साधन काही प्रमाणात हिरावल्या गेले.त्यामुळे त्यांच्या समोर काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या व्यवसायाला आश्रय न मिळाल्याने हे कारागीर अन्य व्यवसायाकडे वळले.मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संकल्पनेतून पूर्वीच्या काळी गावे स्वावलंबी आणि समृद्ध करणाऱ्या या कारागिरांना समृद्धीचे दिवस यावेत,त्यांच्यामध्ये असलेली कारागिरीतील कौशल्ये समृद्ध करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त सुरू करून गावपातळीवरील कारागिर व हस्तकलेच्या लोकांना नव्याने ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि गावे पुन्हा समृद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
         प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अवजारे व साधने यांचा वापर करून तसेच हातांनी काम करणाऱ्या परंपरागत कौशल्य असलेल्या कारागिरांना आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांच्या विकास करण्यासाठी ही योजना मदत करणार आहे.
           प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून पारंपारिक कारागिरांना आणि हस्तकलेच्या लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर त्यांना कौशल्यविषयक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.चर्मकार, सुतार,कुंभार,लोहार,सोनार यासारखे पारंपारिक कौशल्ये असलेल्या कारागिरांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.या योजनेत अशा 18 पारंपरिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. 
           पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यक्तीला प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून व्यवसाय सुरू करण्यास कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या योजनेतून 3 लक्ष रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे.व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लक्ष रुपयांचे कर्ज पहिल्या टप्प्यात दिले जाणार आहे.त्यानंतर व्यवसायाच्या विस्तारासाठी 2 लक्ष रुपयांपर्यंत कर्ज दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध होणार आहे.अत्यंत कमी म्हणजे केवळ 5 टक्के व्याजदराने हे कर्ज व्यवसाय उभारण्यासाठी मिळणार आहे. 
                     प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत विविध 18 पारंपरिक कामांचा समावेश आहे. यामध्ये सुतार,लाकडी होडी(नाव) तयार करणारे,कुलूप तयार व दुरुस्त करणारे,टूलकीट तयार करणारे, सोनार कारागीर, कुंभार, मूर्तिकार, गवंडी काम करणारे मिस्त्री,चर्मकार, चटई व झाडू तयार करणारे, पारंपारिक बाहुल्या व खेळणी साहित्य तयार करणारे,नाव्ही,धोबी, फुलांच्या माळा बनविणारे,मासे पकडण्याच्या जाळ्या तयार करणारे, अवजारे बनविणारे, शिलाई काम करणारे शिंपी आणि लोहार यांचा समावेश होतो.हे 18 प्रकारचे प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना मास्टर ट्रेनर्स हे प्रशिक्षण देणार आहे.प्रशिक्षण घेणाऱ्या कारागीर व्यक्तींना दररोज 500 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.सोबतच पी.एम.विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र,मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अद्ययावत केले जाणार आहे.सोबतच 15 हजार रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
            या योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागीर व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा.या योजनेत समावेश केलेल्या 18 व्यापारांपैकी कोणत्याही एकाशी त्याचा संबंध असणे आवश्यक आहे.
 कारागीर व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.या योजनेत समावेश केलेल्या 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा कारागीर व्यक्ती असावा.
          प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागीर व्यक्तीकडे आधारकार्ड, पॅनकार्ड,उत्पन्न दाखला,जातीचा दाखला,ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,बैंकचे पासबुक आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
            या योजनेचा लाभ घेण्यासाठी  pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावरील Apply Online लिंकवर क्लिक करावे.त्यानंतर पी.एम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करावी.
 नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड संबंधित कारागीर व्यक्तीच्या मोबाईलवर लघु संदेशाद्वारे (एसएमएस) येईल.त्यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचून तो पूर्णपणे भरावा.भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी.
            जास्तीत जास्त कारागीर असलेल्या व्यक्तींना या योजनेतून आपल्या व्यवसायात गतिमानता आणण्यास मदत होणार आहे.या योजनेत नमूद केलेला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक मशीन आणि त्याअनुषंगाने लागणाऱ्या बाबी यामधून करता येईल. 
              जिल्ह्यातील जास्तीत जास्त कारागिर व्यक्तींना प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होण्यास या योजनेतून बळ मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथिकर  (9922204804 किंवा 8010428212) यांचेशी संपर्क साधावा.सुविधा केंद्राचे जिल्हा समन्वयक राजेंद्र पडघान ( 7020942581) यांचेकडून अधिक माहिती घेता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कारागिरांनी या योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.  


विवेक खडसे 
जिल्हा माहिती अधिकारी 
वाशिम

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे