१९ ते २५ नोव्हेंबर कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन



१९ ते २५ नोव्हेंबर कौमी एकता सप्ताह
साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

वाशिम दि.१७ (जिमाका) जिल्ह्यात १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या सप्ताहात रविवार १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त  धर्मनिरपेक्षता,जातीयवादी विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणाऱ्या सभा, चर्चासत्रे व परिसंवाद आयोजित करावे,सोमवार २० नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवसाचे औचित्य साधून यादिवशी अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा. जातीय दंगली उद्भवणाऱ्याा शहरातून बंधुभाव निर्माण करण्यासाठी खास मिरवणुका काढण्यात याव्यात. मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवसाचे निमित्ताने  भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेचा वारसा परिचय करून देण्याच्या दृष्टीने विशेष वाड:मयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात यावीत.

बुधवार २२ नोव्हेंबर रोजी दुर्बल घटक दिवसाचे औचित्य साधून यादिवशी २० कलमी कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने सभा व मेळावे भरविण्यात यावे.यामध्ये इंदिरा आवास योजना व घरांसाठी जागांचे वाटप व कर्जाचे वाटप,अतिरिक्त जमिनीचे भूमी मजुरांना वाटप व गरिबांना कायदेविषयक सहाय्य देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.गुरुवार २३ नोव्हेंबर सांस्कृतिक एकता दिवस या दिवशी भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि संस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.शुक्रवार २४ नोव्हेंबर महिला दिन या दिवशी भारतीय समाजातील महिलांचे महत्त्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देण्यात यावा. 
    
 शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यावरण जोपासना दिवस साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मिळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

हा सप्ताह साजरा करण्यासाठी संबंधितांनी अल्पसंख्याक विकास विभाग यांच्या १ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन परिपत्रकाचे अवलोकन करावे व यंत्रणांनी कौमी एकता सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करावा.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

                 00000

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे