जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या योजनेमुळे दीड वर्षात दिवसा वीज पुरवठा स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या योजनेमुळे दीड वर्षात दिवसा वीज पुरवठा

स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती

वाशिम,दि.२९ (जिमाका) उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी १७५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे टेंडर प्रसिद्ध झाले असून सुमारे अठरा महिन्यात त्याचे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना दिवसा नियमित वीज पुरवठा होईल, अशी माहिती एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी आज २९ नोव्हेंबर रोजी  वाशिम येथे दिली.

नियोजन भवनात महावितरण, महापारेषण,महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभागाच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक  आशिष चंदाराणा आणि महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यावेळी उपस्थित होते.

श्री.पाठक पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना सध्या सिंचनासाठी दिवसा आणि रात्री पाणीपुरवठा होतो. परंतु केवळ दिवसा नियमित पाणीपुरवठा करावा,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेचा वापर करून सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. त्यापैकी साडेतीन हजार मेगावॅट वीजनिर्मितीची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १७५ मेगावॅट वीजनिर्मितीचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतीसंबंधी ३८ उपकेंद्रांना वीज पुरवठा होणार असून जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याचा लाभ होईल. ही कामे अठरा महिन्यात पूर्ण करायची आहेत.

श्री. पाठक पुढे म्हणाले की,वाढती मागणी लक्षात घेता वीज वितरण जाळे मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आरडीएसएस ही महत्त्वाची योजना अंमलात आणली जात आहे. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यात ७५७ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे होणार आहेत.नवीन वीज उपकेंद्रे उभारणे, ट्रान्सफॉर्मर्सची संख्या वाढविणे, स्मार्ट मीटर बसविणे, विद्युत वितरण प्रणाली सुधारणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक दर्जेदार होईल.

पंतप्रधानांची आरडीएसएस योजना आणि मा. उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनांमुळे राज्याचे ऊर्जा क्षेत्र आमूलाग्र बदलणार आहे.या योजनांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत,असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील वीज बिल वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

श्री.चंदाराणा म्हणाले की,नवीन विद्युत जोडणी देताना ग्राहकांना गरजेपुरतीच कागदपत्रे मागावीत.वाशिम जिल्ह्यातील तूट अधिक असेलल्या फीडर्सवर लक्ष केंद्रित करून तेथे वीजबिल वसुलीवर अधिक भर द्यावा.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे