रिसोडची विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल : अनधिकृत शाळा अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा
रिसोडची विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल : अनधिकृत शाळा
अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा
वाशिम,दि.28 (जिमाका) रिसोड येथील मालेगांव रोडवरील विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल या शाळेला शासनाची मान्यता नसतानाही ही शाळा अनधिकृतपणे सुरु असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहे.या शाळेला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देवून तपासणी केली.या शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग शासनाची मान्यता नसताना देखील चालविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.हे वर्ग बंद करुन शाळेचे फलक काढून घेण्यास संबंधित संस्थेला नोटीस बजावण्यात आली.परंतू या संस्थेने इयत्ता 1 ली व वरील वर्ग चालविणे सुरुच ठेवल्यामुळे या संस्थेविरुध्द पोलीस स्टेशन शहर, रिसोड येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सर्व विद्यार्थी, पालक व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल,रिसोड या शाळेला इयत्ता 1 ली ते 12 पर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत शासनाची मान्यता नाही.या संस्थेने सदर वर्ग अनधिकृतपणे सुरु केले होते.तथापी आता याठिकाणी शिकवणी वर्गाचे फलक लागलेले आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थी,पालक व नागरीकांना पुन्हा आवाहन करण्यात येते की,ही शाळा अनधिकृत असून या वर्गांना शासनाची मान्यता नसल्यामुळे कोणीही या शाळेत इयत्ता 1 ली ते 12 वीमध्ये प्रवेश घेवू नये.प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे/पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होवू शकते.त्यामुळे जर कोणत्याही पालकांनी या अनधिकृत शाळेत इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या कोणत्याही वर्गामध्ये आपल्या पाल्याचा/विद्यार्थ्याचा प्रवेश घेतला असल्यास प्रवेश तात्काळ काढून घ्यावा व शासनाची मान्यता असलेल्या अधिकृत शाळेमध्येच प्रवेश करावा.असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment