लाळ खुरकत तसेच पीपीआर प्रतिबंधासाठीजनावरांचे लसीकरण करापशुसंवर्धन विभागाचे आवाहन


लाळ खुरकत तसेच पीपीआर प्रतिबंधासाठी
जनावरांचे लसीकरण करा

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

वाशिम,दि.09(जिमाका)जिल्हयातील 2 लक्ष 21 हजार 917 गाय/म्हैसवर्गीय जनावरे व 1 लक्ष 36 हजार 871 शेळया/मेंढया आहे. गाय/म्हैसवर्गीय जनावरांसाठी लाळ खुरकत लसीकरणसाठी 1 लक्ष 88 हजार 600 लसमात्रा आणि शेळया/ मेंढयांसाठी 1 लक्ष 36 हजार 900 लसमात्रा प्राप्त झाल्या आहे. जिल्हयातील एकुण 62 पशुवैद्यकीय संस्थांना या लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात जनावरांची लसीकरण मोहीम सुरु आहे. लसीकरणापासुन एकही पशुधन वंचित राहणार नाही याबाबत सर्व संस्थाप्रमुखांना दक्षता घ्यावी व जनावरांचे लसीकरण करावे.असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

लसीकरण हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे.पशुधनातील लाळ खुरकत हा रोग विषाणुजन्य आहे. या आजारात पशुधनास 105 ते 106 डिग्री या प्रमाणात ताप येतो.या आजाराने दुधाळ जनावरांच्या दुध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. 

जनावरांच्या खुरामध्ये तसेच तोंडामध्ये जखमा होतात व त्यांचे खाणे पिणे बंद होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते.गाभण गाय/म्हैस यांचा गर्भपात होऊ शकतो.या रोगाची लागण एका जनावरापासुन दुसऱ्या जनावरास होते.या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. शेळया/मेंढयांमधील पीपीआर हा रोग देखील विषाणूजन्य असुन या आजारात 105 ते 106 डिग्री या प्रमाणात ताप येतो.नाकातुन व डोळयातुन सारखे पाणी वाहते. तोंडामध्ये जखमा होतात,श्वास घेण्यास त्रास होतो.जनावरांना हगवन लागुन यामुळे मृत्यु होतो.या रोगाची लागणसुध्दा एका जनावरापासुन दुसऱ्या जनावरास होते.यावरही प्रतिबंधक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. 

जिल्हयातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनास या रोगाची लागण होवू नये याकरीता लसीकरण करुन घ्यावे.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.संजय गोरे, जि.प.चे प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर देशमुख आणि जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालयाचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.अरुण यादगिरे यांनी केले आहे. 
                  *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे