वासुदेवाच्या भूमिकेतून प्रदीप पट्टेबहादूर व संचाने सादर केले वासुदेवाची वारी लोकनृत्य


वासुदेवाच्या भूमिकेतून प्रदीप पट्टेबहादूर व संचाने सादर केले वासुदेवाची वारी लोकनृत्य
 
वाशिम दि.२८ (जिमाका) गावात सकाळच्या वेळी घरोघरी फिरून पांडुरंगावरील अभंग गवळण गात दान मागणारा वासुदेव हा लोककलाकार.  वासुदेवाच्या भूमिकेत प्रदीप  पट्टेबहादूर यांनी वासुदेवाची वारी हे लोकनृत्य महासंस्कृती महोत्सवात आज २८ जानेवारी रोजी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
          डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायात विजार किंवा धोतर पायघोळ अंगरखा,कमरेभोवती उपरणे गुंडाळलेले,एका हातात चिपळ्या दुसऱ्या हातात पितळी टाळ,कमरेला पांवा,मंजिरी अशी वस्त्रे आणि काखेत झोळी,गळ्यात कवड्यांच्या माळा, रंगेबिरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वेश परिधान केलेला हा वासुदेव.
         समाज प्रबोधन करणारी संस्था म्हणून वासुदेवाचा गौरव केला जातो. वासुदेव आपल्या गाण्यातून जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववाद आहे.आपण चांगले काम करीत राहावे आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे.
            छत्रपती शिवाजी महाराजांनी वासुदेवाच्या साह्याने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत.वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातील बातम्याही मिळविल्या आहेत.    
           वासुदेवाची परंपरा मराठी संस्कृतीत हजार ते बाराशे वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव या संतांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळून येतात.प्रदीप पट्टेबद्दूर व त्यांच्या सहकलावंतांनी आज महासंस्कृती महोत्सवात वासुदेवाची वारी हे लोकनृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांनी या लोकनृत्याला उत्तम दाद दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे