विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आणि घरोघरी सर्वेक्षण मोहिमेमुळे नवमतदारांचा टक्का वाढलाजिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांची माहिती


विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आणि घरोघरी सर्वेक्षण मोहिमेमुळे नवमतदारांचा टक्का वाढला

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांची माहिती

वाशिम दि.२२ (जिमाका) यावर्षी  लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्वाच्या निवडणुका होणार आहे.या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज्यात मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आणि घरोघरी सर्वेक्षणाची मोहिम राबविण्यात आली.या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम आणि सर्वेक्षण  मोहीमेमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी दिली. 
            निवडणूका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुध्दीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते.यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप यादी प्रकाशित करुन २०२४ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला.
            या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३ च्या प्रारुप मतदार यादीत ३४ हजार ६१७ मतदारांची नाव नोंदणी झाली.तसेच १९ हजार ३६७ मतदारांची नावे वगळण्यात आली.त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये १५ हजार २५० मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या ९ लक्ष ६८ हजार १२७ इतकी झालेली आहे.त्यानुसार ५ लक्ष ६ हजार २५३ पुरुष मतदारांची, ४ लक्ष ६१ हजार ८५८ स्त्री मतदारांची आणि १६ तृतीयपंथी मतदारांची संख्या झालेली आहे. 
          महिला बचत गट,अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली आहे.त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९०२ वरुन ९१२ इतके झाले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये १० हजार ३४७ मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच २० ते २९ या वयोगटामध्ये १५ हजार ३६३ मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारुप यादीत १८ ते १९ वयोगटाची मतदार संख्या ३ हजार ३४४ (०.२४ टक्के) होती.ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत १३ हजार ६९१ ( १ टक्का) इतकी झाली आहे.तर २० ते २९ वयोगटाची मतदार संख्या  १लक्ष ८३ हजार ७८७ (१३.४१ टक्के) होती.ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत १लक्ष ९९ हजार १५० (१४.५३ टक्के) इतकी झाली आहे. 
               विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबविलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. 
         येत्या लोकसभा व विधानसभा  निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त  पुनरिक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली होती.या सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतुन वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षण कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पुर्ण करण्यात आली. त्यानुसार ११हजार ३५३ मृत मतदारांची नावे मतदार यादीतुन वगळण्यात आली.त्यांपैकी ८० पेक्षा अधिक वय असलेले ३ हजार १६७  मतदार मृत झाले असल्याने त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहे.त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये ५ हजार २६९ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमीलर एन्ट्रीज - PSE) असल्याचे दिसून आले. त्यांची सखोल तपासणी करुन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत १ हजार ७८७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहे.तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेल (डेमोग्राफिकल सिमीलर एन्ट्रीज - DSE) १ हजार ८२९ मतदार आढळुन आले.त्यांची सखोल तपासणी करुन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत ६१९ मतदारांच्या नावे वगळण्यात आली आहे.ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन,स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून,तसेच पुर्ण तपासणी -अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. 
            नाव वगळणीच्या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती.या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड,जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले.त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकुण ४३७ लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली. 
             दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असल्याची खात्री करण्यात आली आहे.तसेच वाशिम जिल्हयात ८ हजार ७१२ एकुण मतदारांची नोंदणी झाली आहे.
      यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या.त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवा वर्गालाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी (Advance Registration) करता आली.त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे.त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.मात्र अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updatation) प्रक्रिया सुरु असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजुनही संधी आहे.
     दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. ‘ मतदाता सेवा पोर्टल ’ या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे.सोबतच मतदान केंद्रसुध्दा तपासुन घ्यावे.जेणेकरुन ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही.तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी ६ क्रमांकाचा अर्ज भरुन आपला मताधिकार सुनिश्चित करावा.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकरी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी केले. 
     सर्व राजकीय पक्षांनाही श्रीमती बुवनेश्वरी यांनी आवाहन करून  आपआपल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीयय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करुन त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे.नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल.तसेच ‘मतदाता सेवा पोर्टल’ आणि ‘वोटर हेल्पलाइन ॲप’ यांवर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधासुध्दा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
                   ********

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे