महाराष्ट्राचा समृद्ध संस्कृती वारसा टिकला पाहिजे :जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन

महाराष्ट्राचा समृद्ध संस्कृती वारसा टिकला पाहिजे
              जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे

 महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन

वाशिम दि.२७ (जिमाका) महाराष्ट्राच्या  लोककला जिवंत ठेवून ह्या लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांना प्रोत्साहन देणे आज गरजेचे आहे. महाराष्ट्राचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा टिकला पाहिजे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले. 
               सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन,वाशिम यांच्या संयुक्त वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन आज २७ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले.यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून श्री.ठाकरे बोलत होते.महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून आमदार ऍड.किरणराव सरनाईक,पोलीस अधीक्षक अनुज तारे,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व जिल्हा परिषद सदस्य आर. के.राठोड यांची उपस्थिती होती.
            श्री.ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांना व कलावतांच्या गुणांना वाव दयावा. महोत्सवाच्या निमित्ताने येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागृत होत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने हे शिवकालीन चित्र व शस्त्र प्रदर्शन पहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
           उदघाटक म्हणून बोलतांना श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,हा महोत्सव महाराष्ट्राच्या मातीशी जुळला आहे.राज्याच्या लोककला ह्या जिवंत राहिल्या पाहिजे,तसेच ह्या लोककला सादर करणाऱ्या स्थानिक लोककलावंतांना महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून ह्या लोककला सादर करण्याची संधी देण्यात येत आहे.नव्या पिढीला ह्या लोककला माहीत होऊन त्याची जपवणूक झाली पाहिजे.असे त्या यावेळी म्हणाल्या. 
    आमदार ऍड.सरनाईक म्हणाले, वाशिम ही वाकाटक राजाची पूर्वी राजधानी होती.महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून जुन्या लोककला आपल्याला बघायला मिळणार आहे. लुप्त होत चाललेल्या प्राचीन लोककला ह्या जिवंत राहिल्या पाहिजे.या लोककलांची ओळख विशेषता विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. जिल्ह्यातील विविध शाळांनी विद्यार्थ्यांना येथे आणून त्यांना प्रदर्शन आणि लोककलांची ओळख करून द्यावी.त्यामुळे मुलांना महाराष्ट्राच्या समृद्ध कलासंस्कृतीचे आगळेवेगळे रूप बघायला मिळणार आहे.असे त्यांनी सांगितले. 
            प्रास्ताविकातून बोलताना श्री.घुगे म्हणाले,महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या प्राचीन समृद्ध लोककलांची ओळख होणार आहे.स्थानिक लोककलावंतांना या महोत्सवातून प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  
           यावेळी कवी गोविंद चतरकर यांच्या *आठवणीतील घर* या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.साहित्यिक तथा लेखक  मोहन शिरसाठ यांनी वाशिम *जिल्ह्याचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढा* यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गजानन वाघ यांनी केले.  
            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा संकुलातील पटांगणावर लावण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि शिवकालीन संस्कृतीचा संदेश देणाऱ्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.या महोत्सवाच्या निमित्ताने रिसोड येथील रांगोळी कलाकार प्रतीक्षा साबळे हिने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी,नागरिकांची विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
  
*सांस्कृतिक कार्यक्रम देत आहे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला उजाळा*  

आपल्या महाराष्ट्राला समृद्ध कला आणि संस्कृतीचा वारसा आहे. प्राचीन लोककला आणि संस्कृतीची नागरिकांना विशेषतः नव्या पिढीला ओळख व्हावी हा महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आहे.आज महासंस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात *गर्जा महाराष्ट्र माझा* या महाराष्ट्र गीताने करण्यात आली. हे महाराष्ट्र गीत लोककवी कलावंत शाहीर विलास भालेराव आणि सहकारी कलावंतांनी केली. वरद विजय काळे या बाल कलावंताने *आऊसाहेब मी शिवबा बोलतोय* हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यश तर एस.एम.सी शाळेचा विद्यार्थी बालकलाकार हरिओम केशव मगर याने आपल्या बोबड्या बोलीत छत्रपती महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर करून उपस्थितांकडुन टाळ्या घेतल्या. श्री.बाकलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी *महाराष्ट्राची थोरवी* हा कार्यक्रम सादर केला.वाशिम येथील बालासाहेब व्यायाम प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी मंडळाचे अध्यक्ष गणेश सावळकर यांच्या नेतृत्वात चित्तथरारक प्राचीन लोककला, साहसी खेळांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे