आसू आणि हासू यांचा सुरेख मिलाफ बाबाराव मुसळे आणि अशोक मानकर यांचे कथाकथन

आसू आणि हासू यांचा सुरेख मिलाफ

बाबाराव मुसळे आणि अशोक मानकर यांचे कथाकथन

वाशीम,दि.३१(जिमाका) आसू आणि हसू ही मानवी जीवनाची अभिन्न अशी दोन अंगे आहेत.या दोहोंत अंतर असते.पण हे अंतर भेदून या दोहोंचा एकाच वेळी प्रत्यय आणून दिला तो जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे आणि विनोदी कथालेखक अशोक मानकर यांनी. 
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन,वाशिमच्या वतीने वाशीम जिल्हा क्रीडा संकुलात महासंस्कृती महोत्सव " वाशिम जिल्ह्यातील बालभारतीमध्ये समावेश असलेल्या लेखकांचे कथाकथन कार्यक्रमात हे दोन्ही लेखक बोलत होते.
                या महोत्सवात लेखक बाबाराव मुसळे आणि कारंजाचे अशोक मानकर यांचा सहभाग होता. 
बाबाराव मुसळे यांनी त्यांची बालभारती इयत्ता सहावीला 'बाकी वीस रुपयांचं काय ?' ही कथा सांगून उपस्थित्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तर लाक्षणिक अर्थाने यावरचा उतारा म्हणून अशोक मानकर यांनी त्यांची इयत्ता सातवीला असलेली ' गचक अंधारी ' ही कथा सादर करून प्रेक्षकांना मनमुराद हसवले.
                  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबाराव मुसळे यांचे स्वागत निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.विनोदी कथालेखक अशोक मानकर यांचे स्वागत उपाजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी केले.कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गजानन वाघ यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे