स्वाधार योजना : 31 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित


स्वाधार योजना : 31 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

वाशिम, दि. 18 (जिमाका) सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण येऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी तसेच पदवीनंतरच्या विविध स्तरावरील व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये महाविद्यालयात / शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुला- मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी शासन निर्णयात नमुद प्रमाणे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरु केली आहे. 

पात्रतेसंबंधी निकष पुढीलप्रमाणे आहे.विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा.या योजनेसाठी निवड करताना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लक्ष रुपयापेक्षा जास्त नसावे.विद्यार्थी वाशिम शहर नगरपालिकेच्या क्षेत्रामधील विद्यालयात प्रवेशित असावा.विद्यार्थी स्थानिक रहीवासी नसावा.वाशिम शहर नगरपालिकेच्या हद्दीच्या परिसरातील रहिवाशी नसावा. इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी/पदवीका अभ्यासक्रम किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.विद्यार्थी इयत्ता 11 वी, 12 वी व इयत्ता 12 वी नंतरच्या पदवी/ पदवीका, व्यावसायीक/ बिगर व्यावसायीक  अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेशीत असावा. अभ्यासक्रमाचा कालावधी हा किमान 2 वर्ष असावा. इयत्ता 10 वी, 12 वी तसेच पदवी/पदवीका अभ्यासक्रमामध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेअंतर्गत प्रवेशित अभ्यासक्रमाकरीता लाभ घेतांना प्रत्येक शैक्षणिक सत्रामध्ये किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. प्रवेशित अभ्यासक्रम विहीत कालावधीमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.दिव्यांगासाठी (अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गुणवत्तेची टक्केवारी किमान 40 टक्के इतकी राहील.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज सादर केलेल्या परंतू प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता swadharyojana.com या संकेतस्थळावरून ऑनलाईन माहिती भरून 31 जानेवारी 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,वाशिम येथे अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे. 
                   *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे