आजच्या लोकशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराची ‍बिजे - प्रा.डॉ.विजय जाधव‘छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरीत्र’ या विषयावर महासंस्कृती महोत्सवात व्याख्यान




आजच्या लोकशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या

राज्य कारभाराची ‍बिजे

                                                                        - प्रा.डॉ.विजय जाधव

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरीत्र’ या विषयावर महासंस्कृती महोत्सवात व्याख्यान

वाशिम, दि. 29 (जिमाका) : शिवाजी महाराजांच्या काळात राजेशाही पध्दतीची शासन प्रणाली होती. राजेशाही शासन प्रणालीचा विचार करत असतांना राजेशाही शासन प्रणाली ही यशस्वी आहे का जर यशस्वी असती तर लोकशाही का आणली या सगळ्या गोष्टींचा विचार करतांना हे सांगता येईल की, आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराची बीजे आहेत. असे मत राज्यस्थान आर्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय जाधव यांनी व्यक्त केले.

28 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या महासंस्कृती महोत्सवात “छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरीत्र” या विषयावर व्याख्यान देतांना प्रा.डॉ.जाधव बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व विधी अधिकारी महेश महामुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.डॉ. जाधव पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठ्या प्रमाणात लिखान झाले असले तरी इतिहासाने पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली नाही. कारण इतिहासाचे पाने उलटवित असतांना असे दिसले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास ज्या अंगाने व्हायला पाहिजे, त्या अंगाने आतापर्यंत झाल्याचे दिसून येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होते की, त्यांच्या पूर्वी त्यांच्या घराण्यामध्ये कोणीही राजे नव्हते. त्यांचे वडील निजामाकडे सुभेदार होते. एखाद्या सुभेदाराचा मुलगा हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो ही साधी गोष्ट नाही. परंपरा लाभलेले लोक कुठपर्यंत जातात हे सांगण्याची गरज नाही. काहीही परंपरा नसतांना आई जिजाऊ मातेच्या संस्काराने त्यांनी दाखविलेल्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाटचाल होती. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर या जगाच्या नकाशावरुन भारताचा नकाशा गायब झाला असता. असे त्यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रपुरते नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचे स्वराज्य उभे केले. असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. असे सांगून प्रा. डॉ.जाधव पुढे म्हणाले, आजच्या लोकशाहीमध्ये सुध्दा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पध्दतीने राज्यकारभार चालविला त्या पध्दतीने ती राजेशाहीसुध्दा श्रेष्ठ होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शिवाजी महाराजांजवळ जेवढे मावळे होते, ते सर्व विविध जाती धर्माचे होते. सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिवाजी महाराजांसोबत काम केले आहे. त्यामुळे त्या सर्व लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे स्वत:चे राज्य वाटायचे लहान मुलांना सुध्दा शिवाजी महाराज हे आमचे राजे आहे असे त्यावेळी वाटत होते. एखादा व्यक्ती जेंव्हा राज्य कारभार सांभाळतो त्याचे राज्य हे सगळ्या लोकांना आपले राज्य आहे असे जर वाटत असेल तर तो राजा चिरकाळपर्यंत लोकांच्या स्मरणात राहतो. छत्रपती शिवाजी राजे त्यांच्याकडे असलेल्या युध्द कौशल्य नितीने युध्द जिंकायचे. त्यांच्यासाठी मावळे जीव द्यायचे. म्हणून राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या स्मरणात राहील. प्रत्येकाने शिवाजी महाराजांना स्मरणात ठेवावे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे