नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी प्रलंबित कामे पुर्ण करावे खासदार भावना गवळी जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभा



नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी 
यंत्रणांनी प्रलंबित कामे पुर्ण करावे
                                                                                       खासदार भावना गवळी

जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभा

वाशिम,दि.05 (जिमाका) जिल्हयाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करुन लाभार्थ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ देता येईल यासाठी प्रयत्न करावा. यंत्रणांना काही अडचण असल्यास जिल्हा प्रशासन व मला कळवावे. त्याचा पाठपुरावा शासन दरबारी करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.अशी ग्वाही खासदार भावना गवळी यांनी दिली.
           आज 5 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हा समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या आढावा बैठकीत श्रीमती गवळी बोलत होत्या.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 
           श्रीमती गवळी पुढे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या विविध योजना आहे. या योजनांचा लाभ जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना व्हावा. यासाठी विविध यंत्रणांनी परिश्रम घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.जेणेकरुन जिल्हयातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.सिंचनासाठी शेतात विहीर असणे आवश्यक आहे.जिल्हयात 10 हजार 286 विहीरीसाठी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.त्यापैकी 8 हजार 230 विहीरींची कामे पुर्ण झाली आहे.2 हजार 56 विहीरींची कामे प्रगतीपथावर आहे.जिल्हयात मनरेगातून 53 हजार 217 कामे सुरु असून 36 हजार 240 कामे पुर्ण झाली आहे.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील 137 कामे सुरु असून त्यापैकी 120 कामे पुर्ण झालेली आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत 6 हजार 625 कामांचे उद्दिष्ट होते.त्यापैकी 4 हजार 149 कामे पुर्ण झाली असून 2 हजार 476 कामे प्रगतीपथावर आहे.जिल्हयात जलजीवन मिशन अंतर्गत 521 योजनेसाठी 559 गावांचा समावेश असून ही कामे तातडीने पुर्ण करावी. गुरांच्या गोठयासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ मंजूरी देवून लाभार्थ्यांना दिलासा दयावा.गुरांच्या गोठयासाठी पंचायत समितीत अर्ज सादर झाल्यावर त्यास तात्काळ मंजूरी प्रदान करावी.मनरेगा सन 2023-24 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मस्टर काढण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांना ट्रेनिंग देण्यात यावी.जेणेकरुन काम तातडीने पुर्ण होईल. जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे. त्याबाबत काही अडचण असल्यास कळवावे त्याची दखल घेवून शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिल्या.
          श्रीमती गवळी पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रुग्ण सेवेवर जास्त भर आहे.जिल्हयात हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची संख्या 16 आहे.त्यापैकी 5 दवाखाने वाशिम शहरात आहे.या दवाखान्यात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन गरजू रुग्णांना चांगली सेवा दयावी. केंद्र व राज्य शासनाचे संपूर्ण लक्ष महिलांच्या सक्षमीकरणावर आहे. महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांचे संपूर्ण जिल्हयात प्रचार व प्रसिध्दी करावी.जिल्हयात भूजल सर्व्हेक्षणानुसार सर्व्हे करुन लाभार्थ्यांना विहीरीचा लाभ दयावा. तसेच मागेल त्याचा विहीर दयावी. जिल्हयातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन दयावे.एकबुर्जी प्रकल्पाच्या डावा व उजवा या दोनही कालव्याचे काम तातडीने करण्यात यावे.जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ वेळेत देण्यात यावा.सांडपाणी व घनकचराचे नियोजन करुन नाले सफाई करावी.आरोग्याच्या दृष्टीने फवारणी करावी.ग्रामसेवकांनी स्वत: लक्ष देवून ही कामे करावी.या कामात टाळाटाळ केल्यास ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल.असे श्रीमती गवळी यांनी यावेळी सांगीतले. 
           सभेत केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,कृषी विभाग,डिजीटल भारत भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना,राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान,एकात्मिक बाल विकास योजना,प्रधानमंत्री उज्वल योजना,प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व गौण खनिज विकास निधी योजनेचा आढावा यावेळी संबंधित यंत्रणांकडून श्रीमती गवळी यांनी घेतला. 
         माहितीचे सादरीकरण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे,जिल्हा शल्कयचिकीत्सक डॉ.अनिल कावरखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा,आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अंजिक्य वानखेडे,जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एस. फेरवाणी,लक्ष्मण मापारी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतिश परभणकर,सर्व नगर परिषदचे मुख्याधिकारी,सर्व गटविकास अधिकारी यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध यंत्रणेचे कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती होती.  
                   *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे