आयुष्मान भारत मिशनअंतर्गत आरोग्य यंत्रणेने रुग्णांच्या सेवेसाठी “मिशन मोडवर” कामे करावे समिती प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे आयुष्मान भारत समिती सभा



आयुष्मान भारत मिशनअंतर्गत आरोग्य यंत्रणेने

रुग्णांच्या सेवेसाठी मिशन मोडवर कामे करावे

                          समिती प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्मान भारत समिती सभा

वाशिम, दि. 12 (जिमाका) :  आयुष्मान भारत मिशनअंतर्गत आरोग्याच्या दृष्टीने रुग्णांना चांगली सेवा देणे महत्वाचे आहे. यंत्रणेनी रुग्णांच्या सेवेसाठी “ मिशन मोडवर ” काम करावे. असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी केले.

आज 12 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयुष्मान भारत मिशन समितीच्या आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश मलिक, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे व जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ.श्री. शेटे म्हणाले, आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभापासून जिल्हयातील एकही नागरीक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आयुष्मान भारत हा प्रधानमंत्री यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. याकरीता पायाभूत सुविधा सुधारण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आरोग्याच्या बाबतीत महत्वाच्या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे. विदर्भाचा अभिमान आहे. चांगला अनुभव घ्यावा आणि वाईट अनुभव सोडून चांगल्या प्रकारे कामे करावे. आयुषमन भारतअंतर्गत चांगले काम करावे. 13 ऑगस्ट 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील तरतुदींचे अद्यावतीकरण करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. या योजनेअंतर्गत रुग्णांना व संबंधित रुग्णालयांना याची मदत होणार आहे. आयुष्मान भारत योजना रुग्णांना खूप फायदेशीर ठरणार आहे. सध्या राज्यात प्रत्येक जिल्हयात दौरा सुरु आहे. राज्यात वाशिम हा आयुष्मान भारतच्या बाबतीत 4 थ्या क्रमांकावर आहे. जिल्हयात आरोग्याच्या दृष्टिने खूप चांगल्या प्रकारे काम सुरु आहे. जिल्हयाला प्रथम क्रमांकावर आणण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगीतले.

डॉ. श्री. शेटे पुढे म्हणाले, रुग्णांना जास्तीत जास्त शासकीय सुविधा देण्यात याव्यात. सन 2024-25 मध्ये महाराष्ट्रात आरोग्यासाठी सर्वात जास्त निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

डॉ. कावरखे म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्परतेने काम करीत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील 0 ते 18 वयोगटातील आरोग्य तपासणी करुन 9 जानेवारी रोजी 12 मुलांवर मोफत ह्दयशस्त्रक्रिया व उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले असल्याचे सांगीतले.

डॉ.कोरे म्हणाले, जिल्हयात हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची संख्या 16 आहे. त्यापैकी 5 दवाखाने वाशिम शहरात कार्यरत आहे. या दवाखान्यात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15 व्या वित्त आयोग सन 2021-22 अंतर्गत 5 रुग्णालयाच्या इमारतीचे 5 कामे पुर्ण झाली आहे. सन 2022-23 मध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तसेच उपकेंद्राचे 8 कामे सुरु असून यापैकी 5 कामे पूर्ण झाली आहे. उर्वरीत 3 इमारतीची बांधकामे प्रगतीपथावर आहे. निती आयोगाअंतर्गत सन 2023-24 मध्ये प्रसुतीगृहे अद्यावतीकरणाचे 5 कामे सुरु असल्याचे सांगीतले.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माहितीचे सादरीकरण जिल्हा समन्वयक डॉ.रंजित सरनाईक यांनी केले. जिल्हयात 1 एप्रिल 2020 पासून महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे लागू झाली आहे. जिल्हयात एकूण 4 लक्ष 91 हजार 495 पात्र लाभार्थी आहे. 28 जुलै 2023 पासून शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्यासह सर्व शिधापत्रिकाधारक कुटूंबांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हयात एकूण 13 रुग्णालये या योजनेमध्ये अंगीकृत करण्यात आली असून त्यापैकी 3 शासकीय आणि 10 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा 5 लक्ष 8 हजार 350 लाभार्थी लाभ घेत आहे. जिल्हयात 26 हजार 246 रुग्णांवर 44 हजार 436 शस्त्रक्रीयेच्या माध्यमातून उपचार करण्यात आला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 4 लक्ष 81 हजार 239 लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले असल्याचे सांगीतले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माहितीचे सादरीकरण समन्वयक तुषार ढोबळे यांनी केले. जिल्हयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम 1 मे 2013 पासून राबविण्यात येत आहे. जिल्हयात एकूण 16 आरोग्य तपासणी पथके कार्यरत आहे. 0 ते 6 वयोगटातील बालकांची वर्षातून दोनवेळा आरोग्य तपासणी करण्यात येते. 6 ते 18 वयोगटातील बालकांची वर्षातून एकवेळा आरोग्य तपासणी करण्यात येते. विशेष उपचाराची आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात येते. हृदयरोगाचे निदान करण्यासाठी 2 डी इको तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात येतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हयात एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वेगवेगळया 170 शस्त्रक्रीया करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पायाभूत सुविधा विकास कक्षाचे उपअभियंता प्रांजल जिंतूरकर यांनी जिल्हयात पायाभूत सुविधेअंतर्गत सुरु असलेल्या बांधकामांची माहिती दिली. यावेळी डॉ.कानडे यांनी 7 हजार 119 रुग्णांचे उपचार व शस्त्रक्रीया केल्याबद्दल, आरोग्य मित्र गणेश जाधव यांनी 30 हजार आरोग्य कार्ड काढल्याबद्दल आणि जिल्हा समन्वयक रंजित सरनाईक यांच्या कार्याचे कौतूक करुन समिती प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा प्रमुख वैभव टकले, जिल्हा वैद्यकीय अधिकारी अनुराग वैद्य, डॉ.अरुण बिबेकर, डॉ.गजानन म्हस्के, डॉ. विजय कानडे, डॉ.सिध्दार्थ देवळे, डॉ. हरिष बाहेती, डॉ.परमेश्वर खराट, डॉ.सौरव भुतडा, डॉ.संजय वोरा, डॉ.अजमल, डॉ.प्रविण ठाकरे, डॉ.राजेंद्र ठाकूर यांच्यासह आरोग्य मित्र यांचेसह संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे