नागरिक हाच 'केंद्रबिंदू' मानून योजनांचा लाभ द्यावा पर्यटन संचालक रोशन थॉमस विकसित भारत संकल्प यात्रेला दिली भेट

नागरिक हाच 'केंद्रबिंदू' मानून योजनांचा लाभ द्यावा
        पर्यटन संचालक रोशन थॉमस

विकसित भारत संकल्प यात्रेला दिली भेट

वाशिम,दि.13 (जिमाका) केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचला पाहिजे.विकसित भारत संकल्प यात्रेचा हाच केंद्रबिंदू मानून जिल्हा प्रशासनाने काम करावे.असे मत केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक रोशन थॉमस यांनी व्यक्त केले. 
           आज 13 जानेवारी रोजी वाशिम शहरातील अकोला नाका येथे जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात श्री.थॉमस बोलत होते.    
      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिलीप मोहपात्रा,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे व तहसीलदार नीलेश पळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            ज्या लाभार्थ्यांना अद्यापही योजनांचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती " विकसित भारत संकल्प यात्रा " या मोहिमेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येत असल्याचे सांगून श्री.थॉमस म्हणाले,विविध योजनांच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास या यात्रेच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे. जेणेकरुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .
                श्री .घुगे म्हणाले,जिल्हयात या यात्रेला 23 नोव्हेंबरला 4 डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली.9 डिसेंबरपर्यंत 6 डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 468 ग्रामपंचायतीमध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली.आतापर्यंत 1 लक्ष 55 हजार 258 नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहे.15 जानेवारीपासून न.प.क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात होणार आहे.तरी नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
          कार्यक्रमाच्या स्थळी आपले सरकार डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर,दिनदयाळ अंत्योदय योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,लोकसेवा हक्क अधिनियम, संजय गांधी निराधार योजना,पुरवठा विभाग,राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य तपासणी आदी योजनांचे स्टॉल उभारण्यात आले.या स्टॉलची पाहणी श्री.थॉमस यांनी यावेळी केली.
      कार्यक्रमादरम्यान उपस्थित काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पी. एम.स्वनिधी,उज्ज्वला योजना,निक्षय मित्रांना आहार कीट लाभाचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी काही लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
        प्रास्ताविकातून श्रीमती देवकर म्हणाल्या,जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांचा प्रचार,प्रसार व लाभ देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.संचालन निलेश गायकवाड यांनी केले.उपस्थितांचे आभार दिगंबर लोखंडे यांनी मानले.
           कार्यक्रमाला राजु पाटील राजे, चंद्रकांत ठाकरे,श्री.तुपसांडे यांच्यासह संबंधित यंत्रणांंचे अधिकारी/कर्मचारी, नागरिक,लाभार्थी व आशा स्वयंसेविका आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे