**‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वाशिम जिल्ह्यात महिला बचतगटांना बळ !** ✨ नवीन स्वयंसहायता समूहांची स्थापना, ऑनलाइन नोंदणी, कर्जवाटप व सीआयएफ निधी वितरणाला गती


**‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वाशिम जिल्ह्यात महिला बचतगटांना बळ !** 

✨ नवीन स्वयंसहायता समूहांची स्थापना, ऑनलाइन नोंदणी, कर्जवाटप व सीआयएफ निधी वितरणाला गती

📍 **वाशिम, दि. २६ सप्टेंबर (जिमाका)** ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, बचतगटांची निर्मिती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वाशिम जिल्ह्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रमांना गती देण्यात येत आहे. २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नवीन स्वयंसहायता समूहांची स्थापना, लोकोस प्रणालीवर ऑनलाइन नोंदणी, बँक कर्ज प्रस्ताव सादर करणे, कर्जवाटप तसेच समुदाय गुंतवणूक निधीचे (सीआयएफ) वितरण करण्यात आले.

🔹 **नवीन समूहांची स्थापना व ऑनलाइन नोंदणी**

कारंजा तालुक्यातील अनई येथे प्रेरणा ग्रामसंघाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. इंझा येथे गुरुमाऊली स्वयंसहायता समूह ऑनलाइन करण्यात आला, तर गृहभेटींद्वारे एका नवीन समूहाची स्थापना करण्यात आली. कामठवाडा येथे दोन स्वयंसहायता समूहांची ऑनलाइन नोंदणी करून एका नवीन समूहाची बांधणी करण्यात आली. तसेच झोडगा येथे एका समूहाची ऑनलाइन नोंदणी आणि नवीन समूह स्थापनेसाठी बैठक घेण्यात आली. मानोरा तालुक्यातील वटफळ येथे वामन बाबा व श्रीगणेशा हे दोन नवीन समूह स्थापन करण्यात आले. पांगरखेडा येथे महाबळेश्वर व शंभूराजे हे दोन समूह ऑनलाइन करण्यात आले. काटा येथे भीमकन्या अनुसूचित जाती प्रवर्गातील समूहाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. गोलवाडी येथे नवीन समूहाची बांधणी करून एका समूहाचा कर्जप्रस्ताव तयार करण्यात आला. शिवनी येथेही नवीन समूहाची स्थापना करण्यात आली.

🔹 **बँक कर्जवाटप व निधी वितरणाला चालना**

सेवा संकल्प अभियानांतर्गत २२ सप्टेंबर रोजी दोन समूहांना बँक कर्जाचे वाटप करण्यात आले. एका समूहाचे बँक खाते उघडण्यात आले. प्रेरणा ग्रामसंघाच्या बैठकीत तीन लाख रुपयांच्या सीआयएफ निधीचे वितरण करण्यात आले. दापुरा येथे एका समूहाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. आसेगाव प्रभागात नवीन स्वयंसहायता समूहाचे बँक खाते उघडण्यासाठी अडीडीसी बँक, आसेगाव येथे प्रस्ताव सादर करण्यात आला.

२३ सप्टेंबर रोजी मंगरूळपीर तालुक्यातील एचडीएफसी बँक शाखेत नांदखेडा येथील शिवम समूह आणि आसेगाव येथील मस्तान शाह समूहाला प्रत्येकी दोन लाख ७० हजार रुपयांप्रमाणे एकूण पाच लाख ४० हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. याच दिवशी सामूहिक समूहाचे १८ लाख रुपयांचे बँक कर्ज प्रस्ताव महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सादर करण्यात आले. चांडस ग्रामपंचायतीतील मा. दुर्गा समूहाला सीआयएफ निधीचे वितरण करण्यात आले, तर विश्वकर्मा हा नवीन समूह ऑनलाइन करण्यात आला.

🔹 **ग्रामसंघ बैठका व मार्गदर्शन**

कामठवाडा येथे ग्रामसंघाची मासिक सभा घेण्यात आली. या सभेत तालुका अभियान व्यवस्थापक तृष्णा ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. गोलवाडी येथे उत्पादक गटाची बैठक घेण्यात आली. मानोरा तालुक्यातील गवा प्रभागात कॅडर आढावा घेऊन सेवा संकल्प अभियानाची माहिती देण्यात आली. यावेळी दोन समूहांतील सर्व सदस्यांचे फेस कॅप्चर घेऊन लोकोस प्रणालीवर ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. यावेळी प्रभाग समन्वयक गुणवंत राठोड व तालुका अभियान व्यवस्थापक वर्षा ठाकरे उपस्थित होते. चांडस येथे तालुका अभियान व्यवस्थापक विनोद कराळे यांनी अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

🌱 **महिला सक्षमीकरणातून स्वावलंबनाचा मार्ग!**

ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना बचत, बँकिंग सुविधा, कर्जपुरवठा आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू आहेत.

#सेवा_संकल्प_अभियान #उमेद_अभियान #महिला_सक्षमीकरण #स्वयंसहायता_समूह #लखपती_दीदी #ग्रामीण_विकास #वाशिम #Washim #जिल्हा_माहिती_कार्यालय_वाशिम

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर