नशामुक्त व सुरक्षित वाशिमसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावाजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन


नशामुक्त व सुरक्षित वाशिमसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावा

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन

जिल्हास्तरीय अमली पदार्थ समन्वय समितीची बैठक

वाशिम, दि. ९ सप्टेंबर (जिमाका) : अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसून त्याचे सामाजिक व कौटुंबिक परिणामही गंभीर आहेत. त्यामुळे युवक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत सातत्याने जनजागृती करणे आवश्यक आहे. अमली पदार्थांची विक्री, तस्करी किंवा सेवनाबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तातडीने प्रशासन किंवा पोलिसांना द्यावी. नशामुक्त व सुरक्षित वाशिम घडविण्यासाठी प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

जिल्हास्तरीय अमली पदार्थ समन्वय समितीच्या (एनकॉर्ड) बैठकीत जिल्हाधिकारी कुंभेजकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी अभियानाची सद्यस्थिती, करण्यात आलेली कारवाई आणि आगामी उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. अभियानाबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी सादर केली.

अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष नशामुक्ती कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. युवकांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

विद्यार्थी आणि युवक हे समाजाचे भवितव्य असल्याने त्यांना अमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत नशामुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रत्येक पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी नोडल अधिकारी आणि विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी कारवाईसाठी पोलिस यंत्रणेने अधिक सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.

शाळा-महाविद्यालये, ग्रामसभा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रभातफेऱ्या, व्याख्याने, लघुपट व भित्तिचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळांमध्ये नियमित क्रीडा उपक्रम, योग व ध्यान शिबिरे तसेच तालुकास्तरावर ‘नशामुक्त युवा क्रीडा सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे.

व्यसनाधीन व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवून त्यांना व्यसनमुक्ती केंद्रांमार्फत वैद्यकीय उपचार, मानसोपचार आणि कौटुंबिक समुपदेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यसनाधीन व्यक्तींना केवळ कारवाईच्या चौकटीत न पाहता त्यांना उपचार व समुपदेशनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवनाकडे वळविण्यावरही भर देण्यात येणार आहे.

अमली पदार्थांची अवैध विक्री किंवा तस्करीबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी तसेच व्यसनमुक्तीविषयक समुपदेशनासाठी नागरिकांनी १९३३ (नशामुक्त हेल्पलाइन), १४४४६ किंवा ७२१८००००७३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन वाशिम पोलिस दलाने केले आहे.

अमली पदार्थविरोधी अभियानाला नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास त्याची परिणामकारकता अधिक वाढेल. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री, तस्करी किंवा सेवनाबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी न घाबरता संबंधित यंत्रणेला द्यावी, असेही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर