नेटवर्क नसलेल्या गावांना संपर्क क्षेत्रात आणाजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश


📱 नेटवर्क नसलेल्या गावांना संपर्क क्षेत्रात आणा

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश

जिल्हास्तरीय दूरसंचार समितीची बैठक

वाशिम, दि. ९ सप्टेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क संपर्क सुविधेपासून प्रलंबित असलेल्या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

जिल्हास्तरीय दूरसंचार समितीच्या बैठकीत त्यांनी दूरसंचार सुविधा, मोबाईल नेटवर्क संपर्क व्यवस्था तसेच दूरसंचार पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेतला.

📍 खैरखेडा आणि गोस्ता गावांना नेटवर्क सुविधा देण्याचे निर्देश

जिलाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, डिजीटीच्या यादीतील गावांनुसार मालेगाव तालुक्यातील मौजे खैरखेडा आणि मानोरा तालुक्यातील मौजे गोस्ता ही गावे मोबाईल नेटवर्क संपर्क सुविधेपासून प्रलंबित असल्याचे बैठकीत निदर्शनास आले.

या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दूरसंचार विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

🏗️ ‘खोदकामापूर्वी माहिती द्या’ प्रणालीचा वापर बंधनकारक

शासकीय तसेच खासगी जमिनीवर कोणतेही खोदकाम करण्यापूर्वी ‘खोदकामापूर्वी माहिती द्या’ (Call Before u Dig – CBuD) या प्रणालीवर नोंदणी करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे.

या प्रणालीच्या वापराबाबत यापूर्वी प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी या प्रणालीचा वापर करून आवश्यक नोंदणी करावी आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

कोणत्याही विभागाची उपयोगिता सेवा बाधित झाल्यास किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास संबंधित विभागाने ही बाब तात्काळ निदर्शनास आणून द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

📡 दूरसंचार पायाभूत सुविधांचा आढावा

दूरसंचार अधिनियम, २०२३ अंतर्गत मार्गाधिकार व संरक्षण याबाबत बैठकीत माहिती देण्यात आली.

दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीसाठी कोणत्याही अतिरिक्त बाबी अथवा मागण्यांची आवश्यकता नसल्याचे दूरसंचार विभागाकडून (DoT) कळविण्यात आले.

तसेच बीएसएनएल ४ जी सर्वव्यापी संपर्क सुविधा अंतर्गत नियोजित १३ ठिकाणी सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या असून, भिल्लदुर्ग येथील सुविधा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

🔎 खैरखेडा येथील नेटवर्क सुविधेचा अहवाल मागविला

मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथील मोबाईल नेटवर्क संपर्क सुविधेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार, मालेगाव यांच्याकडून अहवाल प्राप्त करून घेण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांना देण्यात आल्या.

तसेच बीएसएनएल सीएटी-५ जमीन प्रस्तावाच्या अनुषंगाने कारंजा तालुक्यातील लाडेगाव, मोहगव्हाण आणि वाल्हाई येथील जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून ‘क’ प्रत प्राप्त झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दूरसंचार विभाग आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांना देण्यात आल्या.

📱 हरविलेला किंवा चोरीचा मोबाईल अवरोधित करण्यासाठी ‘संचार साथी’

नागरिकांनी मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तक्रार नोंदविण्यासाठी तसेच हरविलेला मोबाईल अवरोधित करण्यासाठी ‘संचार साथी’ संकेतस्थळाचा वापर करावा, याबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

ज्या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क संपर्क सुविधेच्या अडचणी निदर्शनास येतील, त्या ठिकाणी संबंधित विभागाने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देशित केले.

👥 अधिकारी उपस्थित

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त शिवाजी कासारकर, महाआयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक राहुल काकड, नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभिषेक परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता शामल बागडे आदी उपस्थित होते.

बैठकीस दूरसंचार कंपन्यांचे संबंधित अधिकारीही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

#दूरसंचार #मोबाईलनेटवर्क #डिजिटलवाशिम #दूरसंचारसुविधा #संचारसाथी #CBuD #BSNL4G #डिजिटलमहाराष्ट्र #वाशिम

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर