पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्धकृषीमंत्री दत्तात्रय भरणे दुष्काळसदृश्य परिस्थितीची बांधावरून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद





पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे 

दुष्काळसदृश्य परिस्थितीची बांधावरून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

वाशिम, दि. १९ सप्टेंबर (जिमाका) : अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून, पावसात पडलेल्या खंडामुळे शेती पिकांवर परिणाम झाला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई व मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक, अचूकपणे आणि तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

यावेळी आमदार श्याम खोडे,आमदार अमित झनक,आमदार सईताई डाहाके, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनय आवटे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कृषी सहसंचालक घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मालेगाव तालुक्यातील झोडगा बु., वाशिम तालुक्यातील सूपखेला, मंगरूळपीर तालुक्यातील वरूड बु. आणि कारंजा तालुक्यातील खेर्डा बु. येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पालकमंत्री भरणे यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या अडचणी तसेच आवश्यक मदतीबाबत माहिती जाणून घेतली.

ना.भरणे बोलतांना म्हणाले,सहाही तालुक्यांमध्ये कमी पाऊस व पावसातील खंडामुळे पीक नुकसान आणि टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे, त्यांच्या अडचणी आणि म्हणणे समजून घ्यावे. शासन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असून, त्यांना आर्थिक पाठबळ देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री ना.भरणे यांनी सांगितले.

संकटाच्या काळात शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असेही पालकमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

पीक विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक ती अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांबाबत शासन संवेदनशील असून, त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी पत्रकार,नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर