महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्वरूप जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूरसह विविध देशांतून अर्ज. २५ सप्टेंबर अंतिम मुदत


महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्वरूप

जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूरसह विविध देशांतून अर्ज; २५ सप्टेंबर अंतिम मुदत

वाशिम,दि.१४ सप्टेंबर (जिमाका)
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चा यंदा प्रथमच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर असून, जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूर आदी देशांतूनही अर्ज प्राप्त झाले आहेत.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित या स्पर्धेसाठी राज्यभरातून आतापर्यंत ४३२ गणेश मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळांनी अर्ज सादर करताना गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या गणेशोत्सव व संबंधित सांस्कृतिक उपक्रमांची तसेच यावर्षीच्या गणेशोत्सवाची छायाचित्रे जिओटॅग फोटोंसह सादर करावयाची आहेत. स्पर्धेचे परीक्षण पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असून, मंडळांचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, सांस्कृतिक वारशाचे जतन, भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट आदी बाबींचा विचार केला जाणार आहे.
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७ लाख ५० हजार, ५ लाख आणि २ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच तालुकास्तरीय प्रथम विजेत्यास २५ हजार रुपये, तर जिल्हास्तरीय प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
जगभरातील गणेशभक्तांना सार्वजनिक व घरगुती गणपतीचे ऑनलाइन दर्शन घेता यावे, यासाठी ‘गणेशोत्सव’ पोर्टल १४ सप्टेंबरपासून खुले होणार आहे. या राज्य महोत्सवातील सर्व उपक्रमांमध्ये गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर