सेवा संकल्प अभियान : १९ चिमुकल्यांच्या हृदयाला मिळणार नवी धडधड; मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना
सेवा संकल्प अभियान
१९ चिमुकल्यांच्या हृदयाला मिळणार नवी धडधड; मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना
वाशिम (जिमाका ) :
शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये झालेल्या नियमित आरोग्य तपासणीमुळे जिल्ह्यातील १९ बालकांच्या हृदयातील गंभीर दोष वेळीच निदर्शनास आले आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीनंतर जिल्हा रुग्णालयात विशेष 'द्विमितीय प्रतिध्वनी हृदयतपासणी' संदर्भ सेवा शिबिरात या बालकांची सखोल तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय तपासणीत या सर्व बालकांवर तातडीने हृदयशस्त्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची शाळा व अंगणवाड्यांमध्ये नियमित आरोग्य तपासणी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येते. या तपासणीदरम्यान हृदयाशी संबंधित समस्या आढळलेल्या बालकांना पुढील सखोल तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील विशेष तपासणी शिबिरानंतर १९ बालकांच्या हृदयात गंभीर दोष असल्याचे स्पष्ट झाले.
आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या उपचारांचा खर्च परवडणे शक्य नसलेल्या कुटुंबांना शासनाच्या आरोग्य योजनांमुळे मोठा आधार मिळाला आहे. 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत या १९ बालकांवर संपूर्ण मोफत उपचार व हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना २० सप्टेंबर रोजी मुंबईला रवाना करण्यात आले. 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना' यांच्या माध्यमातून भायखळा, मुंबई येथील बालाजी रुग्णालयात या बालकांवर उपचार केले जाणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली या बालकांना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले. आपल्या पाल्याच्या हृदयावरील शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शासनाच्या माध्यमातून होणार असल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेत झालेली तपासणी, अचूक निदान आणि उपचारासाठी करण्यात आलेली पुढील जलद कार्यवाही यामुळे या बालकांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, बाह्यरुग्ण संपर्क अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक आकाश ढोके, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक तुषार ढोबळे, प्रदीप भोयर, संगीता राजुरकर आणि सविता राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#सेवा_संकल्प_अभियान #वाशिम #राष्ट्रीयबालस्वास्थ्यकार्यक्रम #हृदयशस्त्रक्रिया #आरोग्यसेवा #आयुष्मानभारत #महात्माज्योतिरावफुलेजनआरोग्ययोजना
Comments
Post a Comment