दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुके समाविष्ट शेतकऱ्यांना विविध सवलती व उपाययोजनांचा दिलासापालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुके समाविष्ट
शेतकऱ्यांना विविध सवलती व उपाययोजनांचा दिलासा
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
वाशिम, दि. २६ सप्टेंबर (जिमाका) : खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट, पिकांची प्रतिकूल स्थिती आणि उपलब्ध पाणी परिस्थितीचा विचार करून वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत (ट्रीगर-१) समावेश करण्यात आला आहे.
याबाबत राज्य शासनाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळसदृश परिस्थितीतील विविध उपाययोजना व सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी राज्याचे कृषीमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
खरीप २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून कृषी आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आढळून आली आहे. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. पालकमंत्री श्री भरणे यांनी स्वतः वाशिम जिल्ह्यात पाहणी करून सविस्तर आढावा घेतला व मदतीच्या अनुषंगाने पाठपुरावा केला.
शेतकरी व नागरिकांना विविध सवलती
दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या भागात नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयानुसार विविध उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसूल वसुलीस सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच कृषी पंपाच्या वीजबिलात सवलत यांचा समावेश आहे.
तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांमध्ये शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर, शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व्यवस्था आणि जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. पिण्याचे तसेच जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.
पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
शासन निर्णयानुसार बाधित भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.
या संकटकाळात शेतकऱ्यांना पूर्ण पाठबळ देणे हे आमचे प्राधान्य आहे. शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील तालुक्यांचा दुष्काळसदृश यादीत समावेश झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदत वेळेत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री ना.श्री.भरणे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment