महाराष्ट्र दिनी होणार सामाजिक न्यायाचा जागर · ध्वजारोहणाच्या ठिकाणी समाज कल्याण योजनांची माहिती पत्रिका देणार · लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती

 

महाराष्ट्र दिनी होणार सामाजिक न्यायाचा जागर

·         ध्वजारोहणाच्या ठिकाणी समाज कल्याण योजनांची माहिती पत्रिका देणार

·         लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती

 

          वाशिम, दि. 22 (जिमाका) : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी संपुर्ण महाराष्ट्रात येत्या 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत काढण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपुर्ण राज्यात ध्वजारोहणाच्यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री आणि ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचनही करण्यात येणार आहे.

            यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाने कोरोनापासून राज्य निर्बंध मुक्त होताच समाज कल्याणमंत्री श्री. मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 11 दिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरी केली. राज्य सरकारने दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केला असून, या कालावधीत श्री. मुंडे यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये कालानुरूप सकारात्मक बदल केले आहेत. त्या बदलांचे सकारात्मक परिणाम लाभार्थ्यांच्या टक्केवारीतून दिसून येत आहेत. अनेक योजना नाविन्यपूर्ण रीतीने राबविणे, नवीन काही योजना अंमलात आणणे, याद्वारे विभागाच्या कार्याचा एक वेगळा ठसा या काळात उमटवला आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक यासह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगीतले.

            दरम्यान 01 मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजारोहण होणाऱ्या सर्व शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहिती पत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले आहे. समाज कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांच्यामार्फत या अभिनव उपक्रमाची येत्या महाराष्ट्र दिनी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल यांनी दिली.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे