जलशक्ती अभियान लोकसहभागातून यशस्वी करा -षण्मुगराजन एस.
जलशक्ती अभियान लोकसहभागातून यशस्वी करा
जलशक्ती अभियान सभा
· चित्ररथाचा शुभारंभ
· उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतली जल शपथ
वाशिम, दि. 01 (जिमाका) : पाण्याचा आराखडा आता गावांनीच तयार करुन वर्षभराचे पाण्याचे नियोजन करावे. पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी जलशक्ती अभियान लोकसहभागातून यशस्वी करावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.
आज 1 एप्रिल रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात केंद्र पुरस्कृत जलशक्ती अभियानांतर्गत कामाचा आराखडा तयार करण्यासाठी आयोजित सभेत श्री. षण्मुगराजन अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, यावर्षी पासून जिल्हयात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. गावपातळीवर जल आराखडे तयार करण्यासाठी 4 एप्रिल रोजी ग्रामसभा घेण्यात याव्या. या ग्रामसभेतून गावपातळीवर प्रस्तावित कामाचा आराखडा तयार करण्यात यावा. सर्व शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टींग करुन घ्यावे. खाजगी इमारतीच्या बांधकामाला परवानगी देतांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे बंधनकारक करावे. ग्रामपंचायतीनी तयार केलेला जल आराखडा पोर्टलवर अपलोड करावा. या अभियानासाठी संबंधित विभागाच्या जबाबदाऱ्या व कामाचे स्वरुप निश्चित केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. असे त्यांनी सांगीतले.
दर आठवडयाला या अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यात येईल. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, तीन महिन्यानंतर याचे मुल्यांकन होणार आहे. जलशक्ती अभियानाला लोक चळवळीचे स्वरुप प्राप्त होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. 15 एप्रिलपर्यंत जल आराखडे पूर्ण करण्यात यावे. तलावाच्या व नाल्याच्या काठावर बांबु लागवड करण्याचे नियोजन करावे. ग्रामपंचायतींचा जल आराखडा तालुकास्तरावर तर यंत्रणांचे जल आराखडे जिल्हास्तरावर 12 एप्रिलपर्यंत उपलब्ध करुन दयावे. असे ते यावेळी म्हणाले.
श्री. तोटावार यांनी कॅच द रेन हा कार्यक्रम या अभियानांतर्गत राबविण्यात येत असल्याचे सांगीतले. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यात यावा. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करण्यात यावा. ग्रामस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत ग्रामसभेत जल आराखडे तयार करावे. रोहयोच्या माध्यमातून पाण्याच्या जल संचयावर भर देण्यात येत आहे. विविध योजनेतून बांधण्यात आलेल्या विहीरीत पाण्याचे पुनर्भरण करण्यात यावे. जलसंधारणाच्या विविध यंत्रणांनी पावसाच्या पाण्याचे संकलन व त्याचा योग्य वापराबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी. असे श्री. तोटावार यांनी सांगीतले.
जलशक्ती अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ प्रारंभी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हा नियोजन समिती सभागृह परिसरात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांची उपस्थिती होती. सभागृहात उपस्थित अधिकाऱ्यांनी जल शपथ घेतली. या सभेला जलसंधारणाशी संबंधित विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी व जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या
व्यक्तींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार अनुरेखक संतोष आंबेकर यांनी मानले.*******
Comments
Post a Comment