सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
यांनी केली समृध्दी महामार्गाची पाहणी
·
2 मे रोजी नागपूर ते शेलूबाजारपर्यंत 210
कि.मी.चा पहिला टप्पा सुरु होणार
·
महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र
बदल घडणार
·
नागपूर-मुंबई अंतर 6 ते 7 तासात गाठता येणार
·
डिसेंबर 2023 पुर्वी हा महामार्ग वाहतूकीसाठी खुला होणार
वाशिम, दि. 22 (जिमाका) : राज्याची
राजधानी आणि उपराजधानी मुंबई-नागपूर दरम्यान हिंदुह्दय सम्राट स्व. बाळासाहेब
ठाकरे समृध्दी महामार्गाचा नागपूर-शेलुबाजार दरम्यानचा 210 कि.मी. अंतराचा पहिला
टप्पा येत्या 2 मे रोजी वाहतूकीसाठी खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम
मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आज 22 एप्रिल रोजी श्री.
शिंदे यांचे ठाणे येथून हेलीकॉप्टरने हवाई मार्गाने समृध्दी महामार्गावरुन
शेलुबाजारजवळील जनुना (खु.) शिवारातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर उभारण्यात
आलेल्या हेलीपॅडवर आगमन झाले यावेळी ते बोलत होते. श्री. शिंदे यांचे आगमन होताच बाळापूर
विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख, वाशिम जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम
समिती सभापती सुरेश मापारी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी श्री. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन
स्वागत केले.
शेलुबाजार येथून
नागपूरपर्यंत समृध्दी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी श्री. शिंदे हे नागपूरकडे
रवाना झाले. तत्पुर्वी श्री. शिंदे यांनी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद
साधला.
श्री. शिंदे यावेळी
म्हणाले, येत्या 2 मे रोजी नागपूर-शेलुबाजारपर्यंत 210 कि.मीचा या महामार्गाचा
पहिला टप्पा सुरु होणार आहे. त्याची पुर्वतयारी म्हणून झालेल्या कामाची पाहणी
करण्यासाठी आजचा हा दौरा आहे. 2 मे रोजी नागपूर येथून ज्याठिकाणावरुन या
महामार्गाचा प्रारंभ होतो त्याठिकाणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्रीमंडळातील
काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत या महामार्गाचे उदघाटन होणार आहे. पहिला टप्पा
प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास कसा करता याचे नियोजन महाराष्ट्र
राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
शिर्डीपर्यंतचा हा
महामार्ग देखील येत्या दोन ते तीन महिन्यात पुर्ण होईल. असे सांगून श्री. शिंदे
म्हणाले, भिवंडीपासून मुंबईच्या दिशेने हा महामार्ग नागपूरकडे जाण्यासाठी सुरु
होतो. तेथून आज आपण या महामार्गाची शेलुबाजारपर्यंत हवाई पाहणी केली आहे.
युध्दपातळीवर या महामार्गाचे उर्वरित काम सुरु आहे. ज्या काही अडचणी शिर्डीपर्यंत
या महामार्गात असतील त्यासुध्दा येत्या दोन ते तीन महिन्यात सोडवून त्याचेसुध्दा
लोकार्पण करण्यात येईल. संपुर्ण नागपूर-मुंबई दरम्यानचा 701 किलोमिटरचा हा समृध्दी
महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत किंवा त्यापुर्वी पुर्ण करुन पुर्ण क्षमतेने
नागपूर-मुंबई दरम्यान वाहतूकीसाठी सुरु होईल. आज नागपूर-मुंबई प्रवासाला
रस्तामार्गाने जवळपास 16 ते 18 तासाचा वेळ लागतो. हा महामार्ग पुर्ण क्षमतेने सुरु
होताच हे अंतर केवळ 6 ते 7 तासात गाठता येईल असे त्यांनी सांगीतले.
श्री. शिंदे म्हणाले,
समृध्दी महामार्ग हा केवळ महामार्गच नाही तर तो गेम चेंजर आहे. राज्यासाठी हा महामार्ग
भाग्यरेषा आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणच्या भागाचा विकास
करणारा आणि या भागाला समृध्द करणारा हा महामार्ग आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या
महामार्गामुळे आमुलाग्र बदल घडून येण्यास मदत होणार आहे. या महामार्गावरील शेतकऱ्यांच्या
पांदण रस्त्याच्या प्रश्नांचीसुध्दा सोडवणूक करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने
या महामार्गाने काळजी घेतली आहे. या महामार्गावर 230 अंडरपास तयार केले आहे.
वन्यप्राण्यांची सुध्दा या महामार्गात काळजी घेण्यात आली आहे. त्यांच्या
भ्रमणमार्गात अडथळा येऊ नये म्हणून जवळपास 26 अंडरपास आणि 8 ओव्हरपास या
महामार्गावर तयार करण्यात आल्याची माहिती श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
*******
Comments
Post a Comment