पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करा पालकमंत्री शंभूराज देसाई

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करा

                                                    पालकमंत्री शंभूराज देसाई

पाणीटंचाई व जल जीवन मिशनचा आढावा

वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हयातील ज्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्या गावातील नागरीकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आज 30 एप्रिल रोजी पाणीटंचाई व जल जीवन मिशनचा आढावा घेतांना श्री. देसाई बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम, जि.प.उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे,जि.प अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी  व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी श्री.राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

श्री.देसाई म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधित गावात पाणी पुरवठा योजना योग्यप्रकारे कार्यान्वीत करावी.पाणीपुरवठा योजनांचा प्रस्ताव हा तांत्रिकदृष्ट्या योग्य असावा.ज्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत आहे, तेथील उदभव विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असल्याची खात्री करावी. ज्या गावामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई जाणवते, अशा गावातील नादुरुस्त विंधन विहिरीची उन्हाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी. सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण व गाळ उपसण्याची कामे उन्हाळ्यापुर्वीच करण्यात यावी. त्यामुळे अशा गावांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. असे श्री. देसाई यावेळी म्हणाले.

जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना तातडीने पुर्ण करण्यासाठी यंत्रणेनी नियोजन करावे असे सांगून श्री. देसाई म्हणाले,पाणीपुरवठा योजना पूर्ण  करुन कुटूंबांना नळाद्वारे शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन द्यावे. कारंजा येथील रखडलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

आ. पाटणी म्हणाले, ज्या गावांसाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. त्या तातडीने पुर्ण झाल्या पाहिजे. 6 वर्षापासून कारंजा येथील प्रलंबित असलेली वाढीव पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वीत करावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आ. झनक म्हणाले, ज्या गावांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे चांगल्या प्रकारे व्हावी. भविष्यात ही गावे टँकरमुक्त राहतील याचे नियोजन करण्यात यावे.असे त्यांनी सांगितले.

श्रीमती पंत यावेळी म्हणाल्या,मालेगांव तालुक्यातील वरदरी (बु) आणि रिसोड तालुक्यातील करंजी (गरड) येथे पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उर्वरित 22 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून तातडीने पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी निविदा प्रक्रीया, तांत्रिक मान्यता व अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सन 2021-22 अंतर्गत 324 गावांसाठी 289 उपाययोजना प्रस्तावित आहे. 13 गावात पाणीटंचाई अंतर्गत विहिर अधिग्रहण करण्यात आल्या आहे.जल जीवन  मिशन अंतर्गत सन 2021-22 प्रस्तावित आराखडा 652 गावांसाठी असून यामध्ये 552 योजनांचा समावेश आहे. अशी माहिती श्रीमती पंत यांनी दिली.    

 

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे