जिल्ह्यातील जलसाठयांचे होणार पुनरुज्जीवन सुजलाम सुफलाम अंतर्गत सभा संपन्न जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सभेत शांतीलाल मुथा यांची उपस्थिती
जिल्ह्यातील जलसाठयांचे होणार पुनरुज्जीवन
सुजलाम सुफलाम अंतर्गत सभा संपन्न
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सभेत शांतीलाल मुथा यांची उपस्थिती
वाशिम, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्हा म्हणून केला आहे. जिल्हयाचे पर्जन्यमान कमी असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कोरडवाहू पध्दतीने शेती करतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवून काही काळासाठी सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील जलसाठयांचे पुनरुज्जीवन करण्याकरीता जिल्हा प्रशासन आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त वतीने सुजलाम सुफलाम हे अभियान नोव्हेंबर 2018 पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी आज 1 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व शिखरचंद बागरेचा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात सन 2018 मध्ये आठ यंत्रणांच्या माध्यमातून 4038 जलसंधारणाची कामे करण्यात आली. मागील तीन वर्षात सर्व सहाही तालुक्यातील 180 गावांमध्ये 465 जलसंधारणाची कामे झाली. या कामामधून 64 लक्ष 38 हजार 803 घनमिटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे 643 कोटी 8 लक्ष 3 हजार 50 लिटर पाणी साठयाची क्षमता वाढली. आता 0 ते 10 हेक्टर क्षेत्र असलेल्या तलाव तसेच तळीच्या खोलीकरणाची काम करण्यात यावी. उपसा केलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतीत टाकून घ्यावा. त्यामुळे शेतीची उत्पादक क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळीसुध्दा वाढेल असे ते म्हणाले.
जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, तलावातील गाळ काढण्याची कामे करतांना अडचणी येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच ज्या गावांमध्ये पाणी टंचाई जाणवते त्या गावांमध्ये प्राधान्याने तेथील तलावातील गाळ काढयाची कामे हाती घ्यावी. पावसाळयापूर्वी दोन महिन्याच्या आत नियोजनातून तलावातील गाळ काढण्यात यावा. असे त्यांनी सांगितले.
श्री. मुथा म्हणाले, सुजलाम सुफलाम या अभियानामुळे जिल्ह्यातील ज्या गावशिवाराच्या तलावातील गाळ काढण्याचे काम झाले त्यामुळे जलसंधारणाच्या कामाला बळ मिळाले. गाळामुळे शेतकऱ्यांची शेतीची उत्पादकता वाढली. काही काळासाठी पाण्याचा सिंचनासाठी वापर करता आला. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत देखील वाढ होण्यास मदत झाली. सन 2018 मध्ये जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली. 13 हजार 844 जलसंधारणाची कामे बीजेएसने जिल्हा प्रशासनासोबत केली. असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येईल तेथील ग्रामस्थांना या कामासाठी प्रवृत्त करुन सहभागी करुन घेण्यात येईल. जिल्हा प्रशासनाला बीजेएस तांत्रिक सहकार्य करेल. जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला बीजेएस सहकार्य करण्यास तयार आहे. निती आयोगापुढे या कामाचे सादरीकरण केले. या कामाबाबत निती आयोगाने समाधान व्यक्त केले. पाण्याच्या बाबतीत वाशिम जिल्हा परिपूर्ण झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे श्री. मुथा म्हणाले.
यावेळी निती आयोगाचे सल्लागार अविनाश मिश्रा यांनी सभेत ऑनलाईन सहभागी होवून काही उपयुक्त सुचना केल्या श्री. शांतीलाल मुथा यांनी यावेळी जिल्ह्यातील जलसाठयांचे पुनरुज्जीवन सुजलाम सुफलाम अभियानाअंर्तगत जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाचे सादरीकरण केले.
Comments
Post a Comment