6 ते 16 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

6 ते 16 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

         वाशिम, दि. 06 (जिमाका) : भारतीय राज्‍य घटनेव्दारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेच्या कलम 46 मध्ये समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमुद केली आहे. या कलमामध्ये राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल असे नमुद केले आहे. अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येतात. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्यांचे उद्देश साध्य व्हावेत याकरीता राज्यात 6 ते 16 एप्रिल या कालावधीत समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

             सामाजिक समता कार्यक्रम 6 एप्रिलपासून सुरु झाले आहे. या दिवशी सामाजिक समता कार्यक्रमाचे उदघाटन व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. 7 एप्रिल- सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतीगृहे, निवासीशाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारीत वकतृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व लघुनाटय स्पर्धेचे आयोजन. 8 एप्रिल- स्वाधार शिष्यवृती व मिनी ट्रॅक्टर लाभार्थ्यांना प्रातिनिधीक वाटप. 9 एप्रिल- ज्येष्ठ नागरीकांचे जनजागृती शिबीर व नागरीकांचा मेळावा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतीगृहे, निवासीशाळा येथे रक्तदान शिबीर कार्यक्रम. 10 एप्रिल- समतादुतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाटय व लघुनाटीकेच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन. 11 एप्रिल- महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करणे, महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयांवर वक्त्यांचे मार्गदर्शन. 12 एप्रिल- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत जिल्हयात मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन. मार्जिन मनी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे. 13 एप्रिल- संविधान जागर- संविधान जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे. 14 एप्रिल- सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालये, निवासीशाळा व आश्रमशाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करुन व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन. जिल्हास्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण मेळावा आयोजित करतांना बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातून ऑनलाईन व्हॅलिडीटी प्रमाणपत्र देणे. 15 एप्रिल- समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावा घेवून बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत तृतीयपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटप कार्यक्रम आणि 16 एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे व अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार लाभार्थ्यांचे मनोगत कार्यक्रम आणि समता कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे