जलसंधारणाच्या कामांची दुरुस्ती करुनपाण्याची उपलब्धता वाढविणार- पालकमंत्री शंभूराज देसाई * सुपखेला येथे जलसंधारण कामाचे भुमीपूजन

जलसंधारणाच्या कामांची दुरुस्ती करुन
पाण्याची उपलब्धता वाढविणार
-         पालकमंत्री शंभूराज देसाई
            * सुपखेला येथे जलसंधारण कामाचे भुमीपूजन
 
वाशिम, दि. 27 (जिमाका) :  जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करायची असल्यास भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो. त्यामुळे नव्याने जलसंधारणाची कामे करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जिल्ह्यातील जलसंधारणाची जुनी कामे आहेत ज्यामध्ये पाण्याची साठवणूक होत नाही त्याची दुरुस्ती करुन पाण्याची उपलब्धता वाढवून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
26 जानेवारी रोजी वाशिम तालुक्यात सुपखेला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.देसाई यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,जि.प.सदस्य श्रीमती पट्टेबहादूर,पंचायत समिती सदस्य विद्या खडसे, सुपखेला सरपंच विनोद पट्टेबहादूर व जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल. पा.) श्री. मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. देसाई म्हणाले, या तलावात पाणीसाठा होत नव्हता. या तलावाचे साठवण तलावात रुपांतर या कामातून होणार असल्यामुळे पाण्याची साठवणूक होवून आजूबाजूच्या जवळपास 16 हेक्टर शेतीला आठमाही सिंचनाची व्यवस्था होणार आहे. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात एका तालुक्यात 10 याप्रमाणे 60 कामे यावर्षी मंजूर केली असून 30 कामे सुरु झाली आहे. उर्वरित कामे देखील लवकर सुरु होतील. जलसंधारणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे जिल्ह्यातील 5 ते 6 हजार एकर शेतीला सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे. यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जवळपास 90 कामे घेण्यात येतील. जलसंधारणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे सिंचन क्षमता वाढणार असल्यामुळे अशा प्रकारची कामे जिल्ह्यात झाली पाहिजे यासाठी माझ्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.  
या भूमिपूजन कार्यक्रमाला पारडी/ आसरा, आसोला, खरोडा, बोरी (मापारी) व बाभूळगांव येभील सरपंच तसेच सुपखेला येथील नागरीकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे