*मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणार* पालकमंत्री शंभूराज देसाई
*मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणार*
पालकमंत्री शंभूराज देसाई
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
वाशिम दि २६ (जिमाका) जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्हा म्हणून करण्यात आला आहे. विकास प्रणालीच्या संदर्भात जी मानके आहेत त्याच्या काही बाबी आपण पूर्ण करू शकलो नाही.मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आकांक्षीत जिल्हा म्हणून असलेला ठपका पुसून काढून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते आज २६ जानेवारी रोजी पोलिस कवायत मैदान येथे करण्यात आले. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ऍड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गोरख भामरे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री देसाई म्हणाले,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात गेल्या दोन वर्षापासून विविध योजना तसेच लोककल्याणकारी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधितांवर उपचार तसेच उपाययोजना करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासन यशस्वीपणे काम करीत आहे.कोरोना संसर्गाचा सामना करून हे संकट परतवून लावण्याचे काम राज्यात होत आहे,असे ते म्हणाले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, विशेषत: जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील रस्ते विकासाकडे आपले लक्ष आहे. मागील दोन वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढावी यासाठी काम करण्यात येत आहे.जवळपास ६० ठिकाणी असलेल्या छोट्या जलसंधारण प्रकल्पाची दुरुस्ती करून ती पूर्ववत करून जलसाठा वाढवून त्या परिसरातील शेतीला आठमाही सिंचन व्यवस्था निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री देसाई पुढे म्हणाले, मातोश्री ग्रामीण पांदण रस्ते योजनेतून जिल्ह्याला जास्त निधी देण्यात येईल.अनेक विकासाच्या योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आकांक्षित जिल्ह्यातून वाशीमला बाहेर काढून राज्यातील इतर विकसनशील जिल्ह्यासारखे काम वाशीम जिल्ह्यात सर्वांच्या सहकार्याने करण्यात येईल, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते भारत-पाक युद्धात शहीद झालेले शिपाई यशवंत सरकटे यांच्या वीरपत्नी शांताबाई सरकटे आणि जम्मू काश्मीर येथे वीरमरण आलेले लान्सनायक दगडू लहाने यांच्या वीरपत्नी पार्वताबाई लहाने यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या स्वच्छता रथाला पालकमंत्री श्री.देसाई यांनी हिरवी झेंडी दाखवली. कार्यक्रमाला विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून उपस्थितांची संख्या मर्यादित होती. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले.
Comments
Post a Comment