12 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू
12 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम, दि. 11
(जिमाका) : जिल्हयात 14 जानेवारी रोजी मकरसक्रांत
उत्सव व 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा जातीयदृष्टया
संवेदनशील असून अलिकडच्या काळात शेजारच्या अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्हयात
घडलेल्या जातीय घटनेच्या प्रतिक्रीया आगामी काळात जिल्हयात उमटून कायदा व
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ओमिक्रॉन/
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 10 जानेवारी 2022 पासून सुधारीत
नियमावली लागू केली आहे. सद्यस्थितीत राज्यात एस.टी. महामंडळ कर्मचारी यांचा
महामंडळास राज्य शासनात समावेश करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरु आहे. राज्यात
नोकरीमध्ये पदोन्नतीस मागासवर्गीयांना 33 टक्के आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी
विविध कर्मचारी संघटनांकडून विविध प्रकारच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
एमएसपी कायदा लागू करणे, शेतकरी कर्जमाफी, पीककर्ज मंजूरी, दुध दरवाढ, वाढती
महागाई, वीजबिल माफी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्यासंदर्भात
विरोधी पक्षाच्यावतीने तसेच शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलनात्मक कार्यक्रमाचे
आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा जातीयदृष्टया आणि सण
उत्सवाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे
सोयीचे व्हावे यासाठी 12 ते 26 जानेवारी दरम्यान मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37
(1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. ओमिक्रॉन/
कोविड- 19 प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या बाबींचे पालन
करुन मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) च्या प्रतिबंधात्मक आदेशाने
सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीच्या जमावास एकत्र
जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश कामावरील कोणतेही
पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा
तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास हे
आदेश लागू राहणार नाही.
*******
Comments
Post a Comment