*बहुउद्देशीय कृषी संकुलाचे बांधकाम ऑगस्टपूर्वी पूर्ण करा* पालकमंत्री शंभूराज देसाई बांधकाम इमारतीची केली पाहणी
*बहुउद्देशीय कृषी संकुलाचे बांधकाम ऑगस्टपूर्वी पूर्ण करा*
पालकमंत्री शंभूराज देसाई
बांधकाम इमारतीची केली पाहणी
वाशिम दि.३० (जिमाका) जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे.त्यांच्यापर्यंत शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे.उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून विक्री व्यवस्था तसेच कृषीविषयक प्रशिक्षण देण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या कृषी संकुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.राज्यातील हे पहिले बहुउद्देशिय कृषी संकुल असून स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन हे संकुल वाशिम येथे उभारण्यात येत आहे.या बहुउद्देशीय कृषी संकुलाचे ऑगस्ट २०२२ पूर्वी बांधकाम पूर्ण करण्यात यावे.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांना दिले.
२६ जानेवारी रोजी काटा रोडवरील सुंदर वाटिका भागात उभारण्यात येत असलेल्या बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या बांधकामाला भेट देऊन पालकमंत्री श्री. देसाई यांनी पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार ऍड. किरणराव सरनाईक,आमदार अमित झनक,जिल्हाधिकारी वसुमना पंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मिठ्ठेवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व कंत्राटदार श्री. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित बांधकामाचे कंत्राटदार श्री.चव्हाण यांना सांगितले की,आजच्या स्थितीला हे बांधकाम स्लॅबच्या कामापर्यंत होणे अपेक्षित होते,परंतु आता इमारतीची प्लिंथ पूर्ण झालेली आहे.कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ वाढवून रात्रंदिवस या संकुलाचे बांधकाम करावे.आता बांधकामात खंड पडणार नाही याची संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी.बांधकामासाठी निधीची कमतरता नाही.कोणत्याही परिस्थितीत या संकुलाचे गुणवत्तापूर्ण बांधकाम ऑगस्ट २०२२ पूर्वी पूर्ण करावे. असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
Comments
Post a Comment