वाशिम येथे बेकरीवर कारवाई चार बाल कामगारांची सुटका
वाशिम येथे बेकरीवर कारवाई
चार बाल कामगारांची सुटका
वाशिम, दि. 14 (जिमाका) : बाल कामगार
व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियमातर्गत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे
नियंत्रणाखालील गठित कृतीदलाने आज 14 जानेवारी रोजी वाशिम शहरातील एका आस्थापनेमध्ये
काम करणाऱ्या चार बालकामगारांची सुटका केली. बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी वाशिम येथे एका आस्थापनेवर धाड टाकली असता तपासणी
दरम्यान केकतउमरा रोडवरील, सिंघम बेकरी निमजगाच्या आस्थापनेत एकूण चार बालकामगार काम
करीत असल्याचे आढळून आले. कृती दलाने या बालकामगारांची सुटका करुन संबंधित आस्थापनाधारक
रमेश मौर्या यांचेविरुध्द वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
बालकामगार व किशोरवयीन कामगार प्रतिबंध
व नियमन अधिनियम अंतर्गत कोणत्याही आस्थापनेत बालकामगारांचा सहभाग असल्यास त्याबाबत
कोणताही नागरीक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवु शकतो. या
कायद्याचे उल्लंघन केल्यास काम करुन घेणाऱ्याविरुध्द कलम 14 नुसार दंडात्मक कारवाई
करण्यात येते. तरी बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी नागरीकांनी
सहकार्य करावे व कोणीही बालकामगार कामावर ठेऊ नये. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी,
गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.
धाडसत्राच्या यशस्वीतेसाठी सरकारी कामगार
अधिकारी श्री. नालिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दुकाने निरीक्षक विनोद जोशी, सरकारी कामगार
अधिकारी कार्यालयातील कर्मचारी योगेश गोटे, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील
चाईल्ड लाईन केस वर्कर अविनाश चौधरी, पोलीस कॉन्सटेबल सोनाली नगर व विनू सुर्यवंशी
हया सहभागी होत्या.
*******
Comments
Post a Comment