कोरोना संसर्गाच्या पर्श्वभूमिवर लसीकरणाची होणार काटेकोर अंमलबजावणी · डोस न घेतलेले असणार होम क्वॉरंटाईन · 15 ते 18 वयोगटातील बालकांचे शिबीरातून लसीकरण · कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश
कोरोना संसर्गाच्या पर्श्वभूमिवर
लसीकरणाची होणार काटेकोर अंमलबजावणी
·
डोस न घेतलेले असणार होम क्वॉरंटाईन
·
15 ते 18 वयोगटातील बालकांचे शिबीरातून लसीकरण
·
कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे
आदेश
वाशिम,
दि. 07 (जिमाका) : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्यामुळे बाधितांची संख्या
देखील वाढत आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे या महानगरासह अन्य शहरात देखील कोरोना
व ओमिक्रॉनचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात जिल्हयात कोरोना
बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
यांनी 6 जानेवारी रोजीच्या आदेशाने जिल्हयात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कोविड
लसीकरण मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हयात मुंबई-पुणेसारख्या महानगरातून नागरीकांचे
येणे-जाणे सुरु आहे. वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हयात संपुर्ण लसीकरणाचे
आदेश राज्य शासनाने 27 नोव्हेंबर 2021 रोजी दिले आहे. जिल्हयाच्या लसीकरणाच्या
टक्केवारीमध्ये निर्णायक वाढ करण्यासाठी जिल्हास्तरीय व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना या
आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे
निर्देश दिले आहे.
जिल्हयातील ज्या तालुक्यात लसीकरणाची पहिल्या डोसची
टक्केवारी 90 टक्क्यांपेक्षा कमी आहे तसेच दुसऱ्या डोसची टक्केवारी 70
टक्कयांपेक्षा कमी आहे. अशा तालुक्यात शनिवार व रविवार या सुट्टयांच्या दिवसासह
लसीकरणाचे काम आठवडाभर निरंतरपणे करावे लागणार आहे. ज्या व्यक्तींनी अद्यापही
कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिलाही डोस घेतला नाही अशा व्यक्तींचे होम क्वॉरंटाईन
करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. होम क्वॉरंटाईन करण्याबाबतची वैयक्तिक नोटीस
संबंधित व्यक्तीला ग्रामस्तरावर तलाठी व मंडळ अधिकारी आणि नगरपालिका क्षेत्रात कर
निरीक्षक हे देतील.
15 ते 18 वयोगटातील जिल्हयातील सर्व बालकांचे/
विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये लसीकरण
शिबीराचे आयोजन करुन लसीकरणाची डेटा एंट्री संबंधित शाळा/ महाविद्यालयाच्या
मुख्याध्यापक व प्राचार्याना करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हयात दिवसेंदिवस
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता बाधित रुग्णांवर त्वरीत उपचार
करण्यासाठी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड
हॉस्पीटल तयार करुन ठेवावे. या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि आवश्यक आरोग्य
कर्मचारी वर्ग तयार ठेवण्याबाबत कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment