कोरोना व ओमिक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता जिल्हयात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश · शासकीय व खाजगी कार्यालये, विवाह समारंभ व अंत्यविधीला उपस्थितीची मर्यादा · शाळा व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद · स्विमिंग पुल, शॉपिंग मॉल व सलुनला 50 टक्के मर्यादा · लसीकरण केलेल्या प्रवाशास वाहतूकीस मुभा
कोरोना व ओमिक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता
जिल्हयात
संचारबंदी व जमावबंदीचे आदेश
·
शासकीय व खाजगी कार्यालये, विवाह समारंभ व अंत्यविधीला
उपस्थितीची मर्यादा
·
शाळा व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
·
स्विमिंग पुल, शॉपिंग मॉल व सलुनला 50 टक्के मर्यादा
·
लसीकरण केलेल्या प्रवाशास वाहतूकीस
मुभा
वाशिम, दि. 10 (जिमाका) : कोरोना विषाणूसह ओमिक्रॉन या नव्या
विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. मागील काही
दिवसात राज्यात ओमिक्रॉन कोविड- 19 ने आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या मोठया
प्रमाणात आहे. जिल्हयात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण
ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 9
जानेवारी रोजी संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशासह इतरही निर्बंधाबाबतचे आदेश लागू केले
आहे. सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार
नाही. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा
वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेबर पडण्यास पुर्णत: बंदी राहील.
शासकीय कार्यालयामध्ये अभ्यागतांना कार्यालय प्रमुखाच्या
स्पष्ट आणि लेखी परवानगीशिवाय प्रवेश राहणार नाही. कार्यालय प्रमुखाला
नागरीकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधता येईल. स्थानिक अथवा बाहेरुन येणाऱ्या अभ्यांगतासोबत
व्हीडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सभेचे आयोजन करता येईल. कार्यालय प्रमुख
यांनी आवश्यकतेनुसार कर्मचारी यांचे कामाचे तास ठरवून कामाचे नियोजन करावे. शक्य
असल्यास वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दयावे. कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन होणार
नाही याची दक्षता घेण्यात यावी. कार्यालय व्यवस्थापनाने कार्यालयामध्ये थर्मल स्कॅनर
व हॅन्ड सॅनिटायझरची व्यवस्था करावी.
खाजगी कार्यालयांनी आपल्या व्यवस्थापनाच्या
कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करुन शक्यतोवर वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून
कामे करावी. व्यवस्थापनाने नियमित उपस्थितीच्या 50 टक्केपेक्षा कर्मचारी संख्या
उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या आस्थापना 24 तास सुरु असतात अशा
ठिकाणी शिफ्टनुसार कामे निश्चित करावी. कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक कामासाठी प्रवास
करतेवेळी कार्यालयाचे ओळखपत्र देण्यात यावे व ते सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयामध्ये प्रवेश राहील.
ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. कार्यालयात
कोविड अनुरुप वर्तनाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. व्यवस्थापनाने कामाचे तास
ठरवितांना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सुविधा विचारात घ्यावी.
विवाह समारंभाला जास्तीत जास्त 50 व्यक्तींची,
अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींची आणि सामाजिक/धार्मिक/सांस्कृतीक/
राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित राहतील. शाळा आणि
महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील. इयत्ता
10 वी व 12 वी करीता विविध शैक्षणिक मंडळांनी निश्चित केलेले उपक्रम, प्रशासकीय
उपक्रम आणि वर्गातील शिकवण्या व्यतिरिक्त शिक्षकांनी हाती घेतलेले उपक्रम तसेच
शालेय शिक्षण विभागाव्दारे निर्देशित किंवा परवानगी असलेले उपक्रम, कौशल्य आणि
उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग,
महिला आणि बाल विकास विभाग किंवा कोणत्याही वैधानिक प्राधिकरणाच्या उपक्रमास मुभा
राहील. इतर अत्यावश्यक उपक्रमाकरीता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून
मान्यता घ्यावी लागेल.
स्विमींग पुल, स्पा, वेलनेस सेंटर आणि ब्युटी पार्लर
पुर्णता बंद राहतील. परंतू जीम 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. जीममध्ये प्रत्येक
व्यक्तीने मास्क लावणे बंधनकारक आहे. जीममधील सर्व कर्मचारी आणि 50 टक्के मर्यादेत
येणाऱ्या व्यक्तींनी पुर्णता लसीकरण करणे बंधनकारक आहे. हेअर कटींग सलुन 50 टक्के
क्षमतेसह सुरु राहतील. दररोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. हेअर
कटींग सलुनमध्ये ज्या सलुनसंबंधी प्रक्रीयेसाठी मास्क काढावे लागणार नाही. केवळ
अशाच प्रक्रीया सलुनमध्ये अनुज्ञेय आहे. कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक
राहील. काम करणाऱ्या व्यक्तींने लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्याचे बंधनकारक राहील.
क्रीडा स्पर्धात्मक कार्यक्रमाबाबत केवळ राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुर्वी निश्चित करण्यात आलेल्या स्पर्धा पुढील बंधनासह
घेता येतील. यामध्ये प्रेक्षक नसावेत, सर्व खेळाडू आणि आयोजकाने बायो-बबल शेडयूल
करावे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाकरीता भारत सरकारने निश्चित केलेले सर्व
नियम लागू राहतील. दर तीन दिवसांनी प्रत्येक खेळाडू आणि व्यवस्थापनाने आरटीपीसीआर/ॲन्टीजन
चाचणी करणे बंधनकारक राहील. जिल्हास्तरीय कोणत्याही स्पर्धा आयोजित करता येणार
नाही.
मनोरंजन उद्याने, प्राणी संग्राहालये, विविध संग्रहालये,
किल्ले आणि सामान्य लोकांसाठी इतर तिकीट असलेली ठिकाणे/स्थानिक पर्यटन स्थळे व खेळ
पुर्णता बंद राहील. शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स निर्बंधासह सुरु राहतील.
यामध्ये 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. पुर्ण क्षमता व 50 टक्के क्षमता
याबाबतचे माहितीचे फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. फक्त लसीकरणाच्या दोन्ही
मात्रा घेतलेल्या व्यक्तीनाच परवानगी राहील. रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद
राहतील. सर्व दिवशी घरपोच सेवेला परवानगी राहील.
रेस्टॉरेंट/ कॅटरिंग हे 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता
येतील. पुर्ण क्षमता व 50 टक्के क्षमता याबाबतचे माहितीचे फलक दर्शनी भागात लावणे
आवश्यक आहे. फक्त लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या व्यक्तीनाच परवानगी राहील.
रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील. सर्व दिवशी घरपोच सेवेला परवानगी
राहील. नाटयगृहे/ सिनेमा थिएटर 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. पुर्ण
क्षमतेची माहिती तसेच सध्याच्या प्रेक्षकांची संख्या सूचना फलकावर प्रदर्शित करणे
आवश्यक आहे. केवळ पुर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीनाच यामध्ये परवानगी राहील. सर्व
दिवस रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील.
आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबतीत भारत सरकारच्या
मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम करण्यात येईल. स्थानिक प्रवास हवाई मार्गाने, रेल्वे
मार्गाने, रस्त्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तीना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पुर्ण
झालेल्या असाव्यात. तसेच आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र
सोबत असणे बंधनकारक राहील. हे प्रमाणपत्र 72 तासाच्या कालावधीकरीता वैध राहील.
वरील बाबी हया वाहनचालक, क्लिनर तसेच प्रवास करणाऱ्या व्यक्तींना लागू राहील.
कार्गो वाहतूक, औद्योगिक उपक्रम व बांधकाम उपक्रम हे पुर्ण लसीकरण झालेल्या
व्यक्तीव्दारे सुरु ठेवता येतील. सार्वजनिक वाहतूक नियमित वेळेनुसार पुर्ण लसीकरण
झालेल्या प्रवाशांसह सुरु ठेवता येईल.
संघ लोकसेवा आयोग/ राज्य लोकसेवा आयोग, वैधानिक
प्राधिकरण व सार्वजनिक संस्थेव्दारे आयोजित परीक्षा हया राष्ट्रीयस्तरावर होणाऱ्या
सर्व स्पर्धात्मक परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार घेता येतील.
परीक्षेसाठी उपस्थित राहण्याकरीता हॉल तिकीट तसेच आवश्यक दस्ताऐवज सोबत बाळगणे
अनिवार्य आहे. राज्यस्तरावरील आयोजित सर्व स्पर्धात्मक परीक्षा जेथे हॉल तिकीट
पूर्वीच निर्गमित केले आहे अशा परीक्षा तारखेप्रमाणेच घेण्यात येतील. इतर
परीक्षेकरीता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची मंजूरी घेणे आवश्यक राहील.
परीक्षेदरम्यान कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक राहील.
विमानतळ/ रेल्वे स्थानके व बसस्थानकांकडे किंवा तेथून
24 तास सुरु असलेल्या प्रवाशांसाठी वैध तिकीट सोबत बाळगणे बंधनकारक राहील. दुकाने,
रेस्टॉरंट, हॉटेल किंवा ई-कॉमर्समध्ये गुंतलेल्या कोणत्याही आस्थापनेमध्ये काम
करणाऱ्या सर्व व्यक्तीना पुर्ण लसीकरण करणे आवश्यक राहील. उल्लंघन करणाऱ्या
व्यवस्थापनास जबाबदार धरले जाईल. उल्लंघन करणारे कोणतेही प्रकरण आढळल्यास संबंधित
आस्थापना नियमानुसार बंद करण्यात येईल. सर्व सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तसेच शासकीय
कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरीकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. कोणत्याही
परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तसेच कोविड अनुरुप वर्तनाचे पालन
केले जाते किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याला संबंधित
आस्थापना तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. निर्बंधांचे उल्लंघन
करणाऱ्यांवर तसेच संबंधित आस्थापनेवर दंडनीय कारवाई संबंधित प्राधिकारी करतील.
कोविडच्या अनुषंगाने 25 डिसेंबर 2021 रोजी निर्गमित केलेल्या आदेशातील निर्बंध
कायम राहतील. तसेच कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती/ आस्थापनेवर दंडात्मक
कारवाई करण्याबाबतचे दंड आकारणीचे आदेश यापुढेही कायम राहतील. या आदेशाची
काटेकोरपणे तपासणी व अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना दिले आहे.
*******
Comments
Post a Comment