सार्वजनिक वितरणचे धान्य लाभार्थ्यांना वेळेत वितरीत व्हावे -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

 



सार्वजनिक वितरणचे धान्य

लाभार्थ्यांना वेळेत वितरीत व्हावे

-जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

जिल्हा दक्षता समिती सभा

·        मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत चार बालकांना अंत्योदय रेशनकार्ड वितरीत

वाशिम, दि. 03 (जिमाका) : जिल्हयातील विविध योजनेच्या शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याचे दर महिन्याला वितरण करण्यात येते. धान्याचे वितरण करतांना कोणत्याही लाभार्थ्याची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेऊन जिल्हयातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण लाभार्थ्यांना वेळेत करण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

आज 3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हा दक्षता समितीची सभा  जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. सरनाईक,  जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वजीरे व जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी श्री. सरकटे यांची उपस्थिती होती.

श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयातील ज्याठिकाणी धान्य साठवणूकीचे गोदामे आहेत, त्याठिकाणी पाणी, स्वच्छता, गोदामापर्यंत वाहनाला जाण्यासाठी रस्त्याची सुविधा, गोदामपालासाठी स्वतंत्र खोली आणि चौकीदारासाठी निवासस्थाने असली पाहिजे. गोदामात पाणी गळून धान्य खराब होणार नाही याबाबीकडे विशेष लक्ष देवून आवश्यक त्या दुरुस्त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्वरीत करण्यात याव्या. जिल्हयातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रावर सीसी कॅमेरे लावण्याची कार्यवाही संबंधित केंद्र चालकांनी त्वरीत करावी. रेशनकार्डसाठी नव्याने अर्जदाराने अर्ज केला असेल तर अर्जातील त्रृटीची पुर्तता करुन एका महिन्याच्या आत रेशनकार्डचे वाटप करण्यात यावे. प्रत्येक कार्डधारकांना धान्य देतांना कोविड लस घेतली आहे की नाही याबाबत विचारणा करण्यात यावी. असे ते म्हणाले.

श्री. महाजन यांनी जिल्हयात अंत्योदय योजनेचे 48 हजार 142 कार्ड असून 2 लाख 3 हजार 717 लाभार्थी, प्राधान्य कुटूंब योजनेतील कार्ड धारकांची संख्या 1 लाख 77 हजार 542 असून 7 लाख 49 हजार 610 लाभार्थी आणि एपीएल शेतकरी योजनेतील कार्डधारकांची संख्या 23 हजार 598 असून 97 हजार 925 लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे. अंत्योदय योजनेच्या प्रति शिधापत्रिकाधारकाला 15 किलो गहू 2 रुपये प्रति किलोप्रमाणे आणि 20 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलोप्रमाणे तर 1 किलो साखर मोफत देण्यात येते. प्राधान्य कुटूंबाच्या प्रति लाभार्थ्याला 3 किलो गहू 2 रुपये प्रति किलोप्रमाणे, 2 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलोप्रमाणे, एपीएल शेतकरी योजनेच्या प्रति लाभार्थ्याला 4 किलो गहू 2 रुपये प्रति किलोप्रमाणे आणि 1 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलोप्रमाणे आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या प्रति लाभार्थ्याला 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येत असल्याचे श्री. महाजन यांनी सांगीतले.

जिल्हयात धान्य साठवणूकीची 16 गोदामे असून या गोदामांची क्षमता 12 हजार 720 मेट्रीक टन धान्य साठवणूकीची आहे. सद्यस्थितीत 9 हजार 505 मेट्रीक टन धान्याची या गोदामात साठवणूक केली आहे. जिल्हयात एकूण रास्त भाव दुकानाची 776 परवाने दिली असून यामध्ये 631 वैयक्तिक परवाने, 2 माजी सैनिकांना, 68 महिला बचतगटांना 4 पुरुष बचतगटांना, 2 ग्रामपंचायतीला 26, अनुसूचित जातीच्या व्यक्तींना, 23 अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना आणि 20 सहकारी संस्थांना देण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या 2 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित, 6 दुकानांचे परवाने रद्द व 9 दुकाने दोषी आढळल्याने दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हयातील 40 गावातील रिक्त असलेल्या स्वस्त धान्य दुकानासाठी जाहिरनामे काढण्यात आले असून यासाठी 140 अर्ज प्राप्त झाले. जिल्हयात एकूण 32 शिवभोजन केंद्र असून या केंद्रांना प्रतिदिन 3 हजार 450 थाळयांचे उदिष्ट देण्यात आले असल्याचे श्री. महाजन यांनी सांगीतले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या 4 बालकांना मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेच्या रेशनकार्डचे वितरण करण्यात आले. यात मालेगांव तालुक्यातील 3 आणि वाशिम तालुक्यातील 1 अशा एकूण 4 बालकांना या रेशनकार्डाचे वितरण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन, निरीक्षण अधिकारी श्रीमती सोळंके, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी तसेच त्या बालकांचे संगोपन करणारे नातेवाईक उपस्थित होते.      

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे