*पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन
*पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन*
वाशिम दि.२८(जिमाका) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयाने तयार केलेल्या विविध घडीपुस्तिकांचे प्रकाशन २६ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार ,ऍड.किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक,जि. प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागाने तयार केलेल्या घडीपुस्तिकेमध्ये सायबर सुरक्षेची गरज, सायबर बुलिंग,मार्फिंग, सायबर ग्रुमिंग, बँकविषयक फसवणूक, सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांची कर्तव्य व रिपोर्टिंग पोर्टल याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
निर्भया पथक या घडीपुस्तिकेमध्ये निर्भया पथकाचे उद्दिष्ट,जिल्ह्यातील निर्भया पथकांची संख्या, आतापर्यंत निर्भया पथकाने केलेली कार्यवाही तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलाविषयक कायदयाबाबतचे मार्गदर्शन व त्यांची कार्यप्रणाली याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कल्याण शाखा उपक्रम घडीपुस्तिकेमध्ये कल्याण शाखेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिकारी/अमलदार यांच्याकरिता कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांच्या उत्पन्नाचे साधन म्हणून दक्षता पेट्रोल पंप, सबसिडीअरी कॅन्टीन, दुकान गाळे तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण, स्पोर्ट सेवानिवृत्त अधिकारी/अमलदार यांचा सत्कार, अनुकंपा तत्त्वावर केलेली नियुक्ती रेझिंगमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व इतर उपक्रमाची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
दृष्टी या घडीपुस्तिकेमध्ये वाशिम पोलिस दल सक्षम सतर्क सुरक्षित असल्याचे नमूद केले असून दृष्टी या सर्वसमावेशक पोलीस गस्त प्रणालीबाबतची माहिती देण्यात आली आहे. क्यू आर पेट्रोलिंग, जीपीएस आधारित रात्रगस्त, ग्राम भेट, फिक्स पॉईंट योजना, सुधारित पोलीस दृश्यमानता, प्रभावी पोलिसिंग व कार्यप्रणाली याबाबतची माहिती यामध्ये दिली आहे.
वाहतूक पोलीस शाखेच्या घडीपुस्तिकेत वाहतूक शाखेचे उद्दिष्टे, नवीन नियमानुसार वाहतूक दंडात झालेल्या वाढीचे विश्लेषण,सामान्य जनतेने वाहतुकीसंबंधी पाळावयाचे नियम, विना हेल्मेटबाबत जनतेच्या प्रतिक्रिया, वाहतूक नियमन व नियंत्रण,सुवर्ण तास योजना, रस्ते अपघात,सन २०२० आणि सन २०२१ यावर्षी केलेली विशेष कामगिरी याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा या घडीपुस्तिकेत डायल ११२ याबाबतची माहिती देण्यात आली असून डायल ११२ चे उद्दिष्ट, आतापर्यंत केलेली कामगिरी प्रशिक्षित असलेल्या कर्मचारी वर्ग, यांची सचित्र माहिती व कार्यप्रणाली याबाबतची माहिती या घडीपुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे.सर्व सहाही घडीपुस्तिका सचित्र बहुरंगी आहेत. या कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment