पोलीओ लसीकरणापासून पात्र बालक वंचित राहू नये - षन्मुगराजन एस. जिल्हा समन्वय समिती सभा

 


पोलीओ लसीकरणापासून पात्र बालक वंचित राहू नये

                                                                                                          - षन्मुगराजन एस

जिल्हा समन्वय समिती सभा

 

·        23 जानेवारीला पोलीओ लसीकरण मोहिम

·        1 लाख 21 हजार 268 बालकांना मिळणार डोस

·        2541 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 

वाशिम, दि. 10 (जिमाका) :  जन्माला आलेली भावी पिढी ही सुदृढ आणि सशक्त असली पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे पोलीओ लसीकरण करण्यात यावे. कोणताही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस यांनी दिले.

आज 10 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात 23 जानेवारीच्या राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी षन्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. ठोसर व वाशिम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती चव्हाण यांची उपस्थिती होती.

श्री. षन्मुगराजन पुढे म्हणाले की, 23 जानेवारीला जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पोलीओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात यावी. सर्वच पात्र बालकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. विट भट्टी, गिट्टी खदान आणि मजुरांच्या वस्तीतील पात्र बालकांचे 100 टक्के लसीकरण करण्यावर भर द्यावा. तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानके आणि चौफुलीच्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या बालकांचे पोलीओ लसीकरण करण्यात यावे. असे त्यांनी सांगितले.

डॉ. आहेर म्हणाले, येत्या 23 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला दिड लाख पोलीओ लसीचे डोस प्राप्त झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात 98 टक्के पोलीओ लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात यावर्षी शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील 1 लाख 21 हजार 268 पात्र बालकांना पोलीओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 86 हजार 64 बालके आणि शहरी भागातील 35 हजार 204 बालकांचा समावेश असल्याची माहिती डॉ. आहेर यांनी यावेळी दिली.

23 जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरणासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात 831 आणि शहरी भागात 130 असे एकुण 961 पल्स पोलीओ लसीकरण बुथ राहणार आहे. यासाठी ग्रामीण भागात 2159 आणि शहरी भागात 382 असे एकूण 2541 अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. एक जिल्हा रुग्णालय, 7 ग्रामीण रुग्णालय, 25 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 153 आरोग्य उपकेंद्राअंतर्गत पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. 24,25 आणि 27, जानेवारी 2022 रोजी ग्रामीण भागात तर 24,25,27,28, आणि 29 जानेवारीला आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्व्हेक्षण करुन लसीकरण बुथवर न आलेले व बाहेरगावी गेलेल्या लसीकरणास पात्र बालकांचा शोध घेवून पोलीओ  लसीचा डोस पाजण्यात येणार आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश